बेंगळूर / प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकार कोरोना बाधित रुग्णांना नियुक्त केलेल्या रूग्णालयात उपचार देत आहे. त्या ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांना दर्जेदार पौष्टिक आहार देण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. , एका सरकारी अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली आहे. “कोरोना रूग्णांमध्ये रोगप्रतिकार शक्ती सुधारण्याच्या उद्देशाने त्यांना वेळेवर दर्जेदार व पौष्टिक आहार देण्यात येईल,” असे या अधिकाऱ्याने सांगितले.
सरकारने जरी केलेल्या नव्या आदेशानुसार सकाळी ८ वाजता नाष्टा, दुपारी एक वाजता जेवण आणि संध्याकाळी ८ वाजता जेवण देण्यात येणार आहे. नवीन नियमानुसार रूग्णांना सोमवारी नाष्ट्यासाठी ‘रवा इडली’, मंगळवारी ‘पोंगल’, बुधवारी ‘सेट डोसा ‘, गुरुवारी तांदळाची इडली, शुक्रवारी ‘बिसी बेली बाथ’, शनिवारी ‘चाऊ चाऊ बाथ’ आणि रविवारी ‘सेट डोसा’ दिला जाणार आहे. याचबरोबर आरोग्य विभागाने न्याहारीनंतर दिवसभरात एका फळाची व्यवस्था केली आहे. दुपारच्या जेवणामध्ये सर्व रूग्णांना रोटी, चपाती, पलक्या, भात, डाळ, अंडी आणि दही दिले जाणार आहे. तसेच दररोज संध्याकाळी पाच वाजता एक केळी, दोन खजूर आणि अन्य पदार्थ दिले जाणार आहेत. तर रात्रीच्या जेवणामध्ये रोटी, चपाती, पाल्य, भात, डाळ आणि दही असेल आणि दूध दिले जाणार आहे. नवीन आहारामुळे दक्षिणेकडील राज्यभरातील नियुक्त रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांना याचा फायदा होणार आहे.