बेंगळूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील चन्नागिरी तालुक्यातील नल्लूर येथील सरकारी हायस्कूलच्या पाच दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने वर्गाच्या वेळेत शिक्षकाशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या कृत्यावर ग्रामस्थांकडून तीव्र टीका होत आहे. विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हिंदी शिक्षक असलेले प्रकाश बोगर यांनी जेव्हा वर्गात प्रवेश केला तेव्हा विद्यार्थी त्याच्याशी गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एक विद्यार्थ्यी त्यांच्यावर डस्टबिनने हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. वर्गात शिकवायला लागल्यावर तो विद्यार्थी शिक्षकांच्या डोक्यावर डस्टबिन ठेवत आहे असे व्हिडीयोमध्ये दिसून येते.
या घटनेबाबत बोलताना शिक्षक म्हणाले की, ३ डिसेंबर रोजी वर्गात गुटख्याची पाकिटे पडलेली आढळली. त्यांनी विद्यार्थ्यांना वर्गात कचरा टाकू नये आणि शिस्त पाळावी असे विद्यार्थ्यांना सांगितले. पण त्यांनी शिकवायला सुरुवात केल्यावर काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. पोलिसात तक्रार दिल्यास त्रास होऊ शकतो या भीतीने शिक्षक गप्प बसले. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याची माहिती मिळताच आमदार मदल विरुपक्षप्पा, सार्वजनिक सूचना विभागाचे उपसंचालक जी.आर. थिप्पेस्वामी यांनी शाळेत धाव घेत शिक्षकाशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांकडून भविष्यात असे प्रकार करणार नाही असे लेखी घेतले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शिक्षकांनी पोलिसांत तक्रार न करण्याचा निर्णय प्रकाश बोगर यांनी घेतला.
या घटनेत सहभागी विद्यार्थ्यांना बदली प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांत तक्रार करण्याची मागणीही त्यांनी केली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना, उपायुक्त महांतेश बिलागी म्हणाले की ते सार्वजनिक सूचना विभागाच्या उपसंचालकांकडून अहवाल गोळा करणार आहेत. अहवालाच्या आधारे ते योग्य ती पावले उचलतील.