बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत राजराजेश्वरी नगर आणि सीरा या दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. राजराजेश्वरी नगर विधानसभा बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तर सीरा तुमकूर जल्ह्यातील विधानसभा मतदार संघ आहे. दोन्ही मतदारसंघात सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत ३ लाख २६ हजार ११४ महिलांसह एकूण ६ लाख ७८ हजार १२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जद-एसचे आमदार बी.आर. सत्यनारायण यांच्या निधनामुळे आणि राजराजेश्वरी नगरचे कॉंग्रेसचे आमदार मुनिरत्न अपात्र ठरल्यामुळे या दोन जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी राजराजेश्वरी नगरातील ६७८ आणि सिरा मधील ३३० असे एकूण १००८ मतदान केंद्रावर मतदान होत असल्याची माहिती दिली आहे.