बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यत रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासत असून रुग्णालयांकडून ऑक्सिजन चढ्या दराने खरेदी केला जात आहे. वाढत्या मागणीमुळे ऑक्सिजन ३० ते ३५ पट वाढीव दराने विकला जात आहे.
वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीबरोबरच, राज्यातील बहुतेक रुग्णालयांमध्ये एकतर जास्त दराने ऑक्सिजन खरेदी किंवा ऑक्सिजनचा अभाव आहे असल्याचे पहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने ऑक्सिजनच्या किंमती काही आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत ३० ते ३५ पट वाढलेली आहे असे डॉक्टरांनी म्हंटले आहे. कंपन्यांनी किंमत वाढविली असूनही, वेळेत पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याचे म्हंटले आहे.
खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असोसिएशनने (पीएचएएनए) देखील सद्य परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पीएचएएनएचे पुढील अध्यक्ष डॉ. एच. एम. प्रसन्ना यांनी ऑक्सिजन ३० ते ३५ पटीने महाग होत आहे. कंपन्यांनी किंमत वाढविली आहे. रुग्णांसह डॉक्टरांनाही समस्या येत आहेत. जेव्हा सरकार खासगी रुग्णालयातील उपचाराचे दर ठरवू शकते, तर ऑक्सिजनची किंमत ठरविण्यात काय हरकत आहे? सर्व काही माहिती असतानाही राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि वाणिज्य व उद्योग विभाग हातावर हात ठेऊन का बसले आहे? त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ऑक्सिजनचा योग्य दर निश्चित करावा. असे त्यांनी म्हंटले आहे.