बेंगळूर/प्रतिनिधी
जनता दल-एसचे आमदार बी.सत्यनारायण यांच्या निधनानंतर सीरा विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी भाजपसह, काँग्रेस आणि जेडी-एस यांची तयारी सुरु केली आहे. दरम्यान काँग्रेसकडून सीरा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी टी. बी. जयचंद्रय यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत जयचंद्र यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी उमेदवार निवडीसंदर्भात तुमकुरू जिल्ह्यातील पक्ष नेत्यांशी चर्चा झाली. माजी आमदार के.एन. राजन्ना यांनी टी. बी. जयचंद्रय यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. याबद्दल आम्ही पार्टी हाय कमांडला कळवू असे सांगितले.
कॉंग्रेस आणि जेडी-एस यांच्यात टक्कर
२०१८ मध्ये जयचंद्र मंत्री असूनही निवडणूक हरले होते. सीरामध्ये कॉंग्रेस आणि जेडी-एस यांच्यात चुरशीने निवडणूक झालेली पहायला मिळाली आहे. मागील चार निवडणुकांमध्ये जद-एस उमेदवाराने दोनदा विजय मिळविला आहे. तर दोन वेळा काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे या मतदार संघात चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.