रस्त्यावर पाणी, रहिवाशांना फटका, तातडीने दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
हिंडलगा येथील कर्नाटक हौसिंग बोर्ड कॉलनीतील नादुरुस्त नाल्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळय़ात पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत कित्येक वेळा तक्रारी करूनदेखील संबंधितांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कर्नाटक हौसिंग बोर्डाने विनायक मंदिराच्या पाठीमागे वसाहत योजना राबविली आहे. दरम्यान, बोर्डाने बांधकाम केलेल्या नाल्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही दिवसात नाल्याची दुर्दशा झाली आहे. गतवषी पावसाळय़ात नाल्याची भिंत कोसळल्याने नाल्याशेजारील घरांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी नाल्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. पाणी नाल्यात साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी नाल्याची दुरुस्ती करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
पावसाळय़ात नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढत असतो. शिवाय मिलिट्री विनायक मंदिर येथील तलावातील ओव्हर-फ्लो झालेले पाणीदेखील या नाल्यातून प्रवाहित होत असते. परिणामी पावसाळय़ात नाल्याशेजारील घरांमध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे रहिवाशांना फटका बसत आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी व महानगरपालिकेकडे तक्रारी देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कॉलनीत रस्ते, पथदीप व इतर सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, मागील कित्येक दिवसांपासून कोसळलेल्या नाल्याकडे कानाडोळा झाल्याने हा नाला स्थानिक रहिवाशांना त्रासदायक ठरत आहे. संबंधितांनी तातडीने नाल्याची दुरुस्ती करून बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.
पावसाळय़ात घरांमध्ये शिरते पाणी – विनायक सावंत (रहिवासी)
अरुंद असलेला हा नाला कोसळून दुर्दशा झाली आहे. नाल्याच्या भिंती कोसळल्याने पावसाळय़ात घरांमध्ये पाणी शिरत आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाणी ओव्हर-फ्लो होऊन रस्त्यावरून वाहत आहे. शिवाय पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पाणी नाल्यात साचून राहत आहे. संबंधितांनी तातडीने पाहणी करून पावसाळय़ापूर्वी नाल्याची दुरुस्ती करावी.