राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश : सीझेडएमए आदेशाला आव्हान दिलेली याचिका फेटाळली
प्रतिनिधी /पणजी
भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या खूनप्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या हणजूण येथील कर्लिज बीच शॅक-नाईट क्लबचे बेकायदा बांधकाम पाडण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सदर बांधकाम आता पाडावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीस दिवसांच्या आत सर्व परवाने रद्द करुन कर्लिज जमीनदोस्त करा, असा आदेश सर्व संबंधित खाती, प्राधिकरणे, हणजूण पंचायत यांना दिला आहे.
गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) 21 जुलै 2016 रोजी कर्लिजचे बेकायदा बांधकाम पाडण्याचा आदेश जारी केला होता. त्या आदेशाला कर्लिजच्या मालकीण लिनेट नुनीस यांनी हरित लवादाकडे आव्हान दिले होते.
लिनेट नुनीस यांचे आव्हान फेटाळून लावताना प्राधिकरणाचा निकाल लवादाने उचलून धरला आणि तो आदेश योग्य असल्याचे सांगून बेकायदा बांधकाम मोडून टाकावे आणि तेथील जमीन पूर्ववत होती तशी करण्यात यावी असे लवादाने बजावले आहे.
कर्लिजचे बांधकाम बेकायदेशीरच
प्राधिकरण आणि लवादाच्या या निकालामुळे कर्लिजचे बांधकाम बेकायदा होते हे स्पष्ट झाले आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून कर्लिजचे बेकायदा बांधकाम करण्यात आल्याचे लवादासमोर झालेल्या सुनावणीतून उघड झाले आहे.
आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेटये यांनी कर्लिजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सीआरझेडच्या विकास प्रतिबंधक क्षेत्रात (नमो डेव्हलपमेंट झोन) ते बांधकाम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
तात्पुरते बांधकाम केले कायम
पूर्वी ते तात्पुरते बांधकाम होते आणि त्यासाठी पंचायतीने ना हरकत दाखला दिला होता. ते बांधकाम सर्व्हे नं. 42/10 पुरतेच मर्यादीत होते. परंतु नंतर ते बांधकाम कायमस्वरूपी करून सर्व्हे नं.-42/9, 42/11, 45/19, 45/41 या जमिनीत वाढवण्यात आले.
विस्तारीत बांधकाम बेकायदेशीर
सर्व्हे नं. 42/10 मधील पूर्वीचेच बांधकाम प्रतिवादीचे असल्याचा दावा प्रथम करण्यात आला होता. परंतु नंतर सर्व विस्तारीत बांधकाम त्याचेच असल्याचे व ते त्यानेच ताब्यात घेतल्याचे उघड झाले. त्यासाठी कोणतेच परवाने घेण्यात आले नाहीत आणि बांधकामाची संपूर्ण जागा सीआरझेड व विकास प्रतिबंधक क्षेत्रात येते (नो डेव्हलमेंट झोन) असे निरीक्षण लवादाने नोंदवून हा निकाल दिला आहे.
सुधीर, सुखविंदरच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ
सोनाली फोगट खूनप्रकरणी अटक करण्यात आलेले मुख्य संशयित आरोपी सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांना काल गुरुवारी पुन्हा रिमांडसाठी म्हापसा अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्या संशयितांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सर्व परवाने रद्द करुन तीस दिवसांत जमीनदोस्त करा
जुन्या तात्पुरत्या बांधकामावर नवीन कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आले असून ते व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणले आहे. परंतु त्यासाठी कोणतेच परवाने घेण्यात आलेले नाहीत. कर्लिज बीच शॅक नाईट क्लबमधील सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करण्याचे निर्देश लवादाने गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणास दिले आहेत. तसेच अबकारी खाते व आयुक्तांनी त्या बार-रेस्टॉरंटला दिलेला मद्य विक्री-सेवनाचा परवाना मागे घ्यावा. वीज तसेच पाणी जोडणी तोडावी तसेच हणजुणे ग्राम पंचायतीने व्यापारी परवाना रद्द करावा. येत्या 30 दिवसांत ही सर्व कारवाई पूर्ण करण्यात यावी असे लवादाने निकालातून स्पष्ट केले आहे.