आरटीओतील घोटाळय़ाची चौकशी करून पुढील कार्यवाही – अनिल परब
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 31 मार्च 2020 पर्यंत वाहन कर घोटाळय़ातील त्या वाहनांचा कर भरून घेऊन ती वाहने नियमित केली जाणार आहेत. तसेच या कर घोटाळय़ात अधिकारी दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घोटाळय़ातील रकमेच्या वसुलीची कारवाई केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहनांची नोंदणी होऊन ऑनलाईन कर भरल्यानंतर झालेल्या घोटाळय़ाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त संदेश चव्हाण, सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन रजिस्ट्रेशन व आकर्षक नंबरप्लेटचे काम करून देणाऱया खासगी व्यक्तींकडून बनावट खोटे वाहन परवाने देऊन रजिस्ट्रेशनची व आकर्षक नंबरची रक्कम स्वीकारली गेली. मात्र त्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. ती वाहने रस्त्यावर फिरविता येणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱयांनी सांगितले. त्यानंतर आमदार नाईक यांनी वाहन मालकांच्या बाजूने भूमिका घेत ती वाहने अडवू नयेत, असा इशारा दिला होता.
तसेच याबाबत आमदार नाईक यांनी परिवहन मंत्र्यांकडे तक्रार करून वाहन कर घोटाळय़ाप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यामध्ये वैभव नाईक, संदेश पारकर यांनी कर घोटाळय़ाबाबत चौकशी करण्याची मागणी केली. सदर वाहने बीएस-4 प्रणालीतील असून त्यांची नोंदणी बंद झाली आहे. या घोटाळय़ात सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील काही अधिकाऱयांचा समावेश आहे, याकडे लक्ष वेधले. त्या वाहनांची नोंदणी करून देण्याची मागणी करण्यात आली होती.