प्रतिनिधी/ कराड
कोरोनाच्या संकटाने अर्थकारण बिघडलेल्या मलकापूर नगरपरिषदेने आता कर वसुलीचा धडाका लावला आहे. कर भरा अन्यथा मालमत्ताचा लिलाव करू, असा इशाराच नगरपरिषदेने दिल्याने 143 मालमत्ताधारकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या थकबाकीदार मालमत्ताधारकांची 50 हजारांपेक्षा जास्त वसुली थकीत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यंदा नगरपरिषदेच्या अर्थकारणाला मोठा ब्रेक लागला. शहरातील सुरू असलेली विकासकामेही रखडली. त्यामुळे नगरपरिषदेने आता कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. थकबाकीदारांना नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू असून वेळप्रसंगी थकीत कर वसुलीसाठी जिल्हाधिकाऱयांची परवानगी घेऊन मालमत्तांचा लिलाव काढला जाणार आहे. चौकाचौकांमध्ये थकबाकीदारांच्या नावाचे फलक लावण्यात येणार आहेत. नळ कनेक्शन बंद करणे, जप्ती वॉरंट काढणे, ध्वनिक्षेपकावरून नाव पुकारून सावधान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मलकापूर नगरपरिषदेच्या हद्दीत 18 हजार 425 मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी पन्नास हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱया मालमत्ताधारकांची संख्या 143 आहे. त्यामुळे चालू कर व थकबाकी वसूल करण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेच्या कर विभागाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षे व त्यापेक्षाही जुनी कराची वसुली असून ती वसूल व्हावी म्हणून कर विभाग प्रयत्नशील आहे.
यावर्षी चतुर्थ वार्षिक करवाढ झाली असून मागील करापेक्षा 19 टक्के जादा करवाढ झाली आहे. यंदा मलकापूर नगरपरिषदेने शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच सुमारे साडेतीन कोटी वसुलीच्या उद्दिष्टांपैकी 5 फेब्रुवारीपर्यंत दोन कोटी 25 लाख वसूल झाला आहे. उर्वरित सुमारे सव्वा कोटीच्या वसुलीसाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील, त्या करण्याची तयारी कर विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कारवाईला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाईची टांगती तलवार आहे.