सोन्या-चांदीचे दागिने पळविले : दानपेटीतील रक्कमही लांबविली; हिरेबागेवाडी पोलिसांत घटनेची नोंद
प्रतिनिधी /बेळगाव
कलारकोप्प, ता. बेळगाव येथील बसवेश्वर मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली असून चोरटय़ांनी सुमारे अडीच लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व दानपेटीतील रक्कम पळविली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांनी सुमारे अडीच ते तीन लाख रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे.
चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर मंदिरात गावकऱयांची गर्दी जमली होती. नेहमीप्रमाणे शनिवार दि. 8 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आला होता. रविवारी पहाटे 3 वाजता चोरटय़ांनी गाभाऱयाचा कडीकोयंडा तोडल्याचे उघडकीस आले. बसवेश्वर मंदिरातील चांदीचा मुखवटा, चांदीचा गुंडगडगी, पादुका, बसवेश्वरांची मूर्ती, चांदीचा हार पळविला आहे.
बसवेश्वर देवस्थानातील दानपेटीतील सुमारे एक लाख रुपये पळविण्यात आले आहेत. या मंदिराच्या आवारातील लक्ष्मी-सरस्वती मंदिरातही चोरी झाली आहे. चोरटय़ांनी 5 ग्रॅमची दोन मंगळसूत्रे, दोन चांदीची गुंडगडगी, देवीचे चांदीचे दोन मुखवटे असे सुमारे 1 लाख 22 हजार रुपये किमतीची अडीच किलो चांदी, 40 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोने व आणखी एका दानपेटीतील एक लाख रुपये चोरटय़ांनी पळविले आहेत. यासंबंधी पडय़ाप्पा नायकर (वय 68) यांनी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत. उपलब्ध माहितीनुसार गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हिरेबागेवाडी पोलिसांनी याच मंदिरात गावकऱयांची बैठक घेऊन चोऱया, घरफोडय़ा टाळण्यासाठी नागरिकांनी कशी खबरदारी बाळगायची, याविषयी मार्गदर्शन केले होते. आता त्याच मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे.