मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ : 50 कोटी खर्च, दोन मोठी प्रेक्षागृहेही उभारणार
प्रतिनिधी /पणजी
कला व संस्कृती क्षेत्रातील गोव्याचे भूषण आणि वास्तुकलेचा अनोखा नमुना असलेल्या कला अकादमी इमारतीच्या दुरुस्तीकामाचा शुभारंभ आज दि. 5 एप्रिल रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते होणार आहे.
सकाळी 9.30 वाजता होणाऱया या सोहळ्यास त्यांच्या समवेत कला व संस्कृती मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे, साबांखा मंत्री दीपक पाऊसकर, आमदार बाबूश मोन्सेरात, मुख्य सचिव परिमल राय, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जगप्रसिद्ध वास्तुशिल्पकार चार्लस् कुर्रैया यांनी तयार केलेल्या आराखडय़ानुसार 50 वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. त्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच सरकारने सुमारे 50 कोटी खर्च करून या इमारतीचे दुरुस्तीकाम हाती घेतले आहे.
या दुरुस्तीकामात प्रामुख्याने संपूर्ण इमारतीचे वॉटरप्रुफिंग, वीज व्यवस्थेचे नुतनीकरण, ब्लॅक बॉक्स तसेच आर्ट गॅलरीची दुरुस्ती, नुतनीकरण आणि रंगकाम यांचा सामवेश आहे. त्याशिवाय प्रत्येकी 300 आणि 600 आसनक्षमतेचे दोन प्रेक्षागृहही बांधण्यात येणार आहेत. ही सर्व कामे पुढील वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ही सर्व कामे करताना कला अकादमी वास्तू पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे अकादमीचे कार्यालय आणि थिएटर वर्ग काही काळासाठी पणजीतील जुन्या सचिवालय इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. तर सांस्कृतिक आणि अन्य कार्यक्रम फोंडय़ातील राजीव गांधी कला मंदिर तसेच राज्यातील विविध रविंद्र भवनमध्ये होणार आहेत.
राजधानीच्या कांपाल भागात मांडवीच्या किनारी मनमोहक वनराईत वसलेल्या दिमाखदार अशा कला अकादमीच्या वास्तूत दिनानाथ मंगेशकर कला मंदिर, खुले थिएटर, ब्लॅक बॉक्स, वाचनालय, शैक्षणिक वर्ग, कार्यालय, पॅन्टिन, असे विभाग आहेत. तेथे कायम आणि हंगामी मिळून सुमारे 200 लोक काम करतात.
’गोमंत दर्शन’ चे सादरीकरण
दरम्यान, आजच्या या सोहळ्यानिमित्त सकाळी 9.30 वाजता गोमंतकीय कला, संस्कृती, लोकसंगीत, लोकनाटय़ यांचे दर्शन घडविणाऱया ’गोमंत दर्शन’ या कार्यक्रमाची झलक अकादमीच्या थिएटर आर्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे दाखविण्यात येणार आहे.
1990 मध्ये कला अकादमीने या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. यंदाचे वर्ष हे गोवामुक्तीचे हिरक महोत्सवी वर्ष असल्यामुळे कला अकादमीने ’गोमंत दर्शन’ ची नव्याने निर्मिती केली आहे. हिरक महोत्सवी वर्षानिमित्त देशाच्या विविध शहरात आणि गोव्यातील अनेक भागात कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. त्यात गोमंत दर्शनचाही समावेश असेल.