प्रतिनिधी / पणजी
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आज कला अकादमीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये सकाळी 10 वाजता कला अकादमीचे अध्यक्ष आमदार गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
कला अकादमीच्या गोवा कॉलेज ऑफ थिएटर आर्टस् चे प्राचार्य रामराव वाघ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांच्या सोबत प्रा. अफसर हुसेन आणि सहयोगी प्रा. सतीश नार्वेकर यांची उपस्थिती होती. आज दि. 27 रोजी होणाऱया जागतिक रंगभूमी दिनानिमित्त होणारे कार्यक्रम तसेच दि. 31 रोजी महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष विद्यार्थ्यांतर्फे सादर करण्यात येणाऱया नाटय़प्रयोगाविषयी श्री. वाघ यांनी माहिती दिली.
आज होणाऱया कार्यक्रमास श्री. गावडे यांच्या सोबत सन्माननीय अतिथी म्हणून प्रसिद्ध नाटय़कलाकार रविंद्र आमोणकर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमानंतर ’सी. आल्वारीस यांचे जीवनकार्य’ या विषयावर फा. आग्नेल कला महाविद्यालयाचे कोकणीचे सहयोगी प्राध्यापक फा. मिल्टन रॉड्रिगीश यांचे भाषण होईल. त्यानंतर कला अकादमीने घेतलेल्या राज्यपातळीवरील ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात येतील. त्यानंतर प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांतर्फे सादरीकरण होईल. प्रा. अफसर हुसेन यांच्यातर्फे ’अमिना आपा का रेडिओ’ हे एकपात्री सादरीकरण होईल. त्यानंतर मान्यवरांची भाषणे आणि बक्षिस वितरणाने कार्यक्रमाची सांगता होईल. बुधवार दि. 31 रोजी महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष विद्यार्थ्यांतर्फे मोहन राकेश लिखित ’आधे अधूरे’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. दिनानाथ मंगेशकर कलामंदिरात दुपारी 3 वाजता पहिला प्रयोग आणि नंतर सायं. 7 वाजता दुसरा प्रयोग होणार आहे. प्रयोग सर्वांसाठी खुले असून कोरोना मार्गदर्शक तत्वे पाळून प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती श्री. वाघ यांनी दिली.