अन्यायग्रस्त कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत : चौकशीसाठी सरकारने समिती स्थापण्याची मागणी
प्रतिनिधी / पणजी
गोवा कला अकादमी नियमांना हवे तसे फिरवून स्वतःच्या समाजातील कर्मचाऱयांना पात्रता नसताना बढत्या दिल्याचा आरोप अन्यायग्रस्त कर्मचाऱयांनी केला आहे. त्यामुळे सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापून या प्रकाराची सखोल चौकशी करून सर्वांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कला अकादमीच्या कॉलेज ऑफ थिएटरमध्ये झालेल्या प्राचार्य पदाच्या वादग्रस्त नेमणुकीनंतर कला अकादमीचे माजी सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर यांच्या कारकिर्दीतील अनेक गैरव्यवहार सध्या उघडकीस येत आहेत. यासंदर्भात माहिती हक्क कायद्याखाली अर्जांचा खच कला अकादमीत पडला असून त्यातून अचंबित करणारी माहिती हाती आली आहे. सर्व शैक्षणिक पात्रता, अनुभव व कार्यालयीन ज्ये÷ता असलेल्या कर्मचाऱयांवर केवळ क्षुल्लक नियमांवर बोट ठेवून त्यांच्या बढत्या नाकारून, हेतूपुरस्सरपणे त्यांना डावलल्यामुळे या कर्मचाऱयांत तीव्र नाराजी पसरली आहे. सदर कर्मचाऱयांनी वेळोवेळी लेखी तसेच तोंडी विनंती करून देखील त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी करत आहेत. आडमार्गाने एकाच्या पुतण्याला कला अकादमीच्या सेवेत घेतले आहे.
कला अकादमीत वरि÷ कारकून म्हणून काम करणारे संदीप कळंगुटकर केवळ दहावी उत्तीर्ण आहेत. त्यांना भरती नियमांत आपल्याला हवे तसे फेरफार करून चक्क नाटय़ विद्यालयाच्या व्याख्याता पदावर बढती देण्याचा विश्वविक्रम केला आहे. आत्तापर्यंतच्या स्कूल ऑफ ड्रामामध्ये वसंत जोसलकर, अफसर हुसेन तसेच पद्मश्री जोसलकर यांच्या रिक्त जागी कारकून म्हणून काम करणा-या कळंगुटकर यांची वर्णी लावली आहे.
रंगमेळ विभागात वस्त्रपट सहाय्यक (कारकून समतुल्य पद) म्हणून काम करणारे प्रेमानंद पोळे यांच्याकडेही नाटय़ विद्यालयाचा डिप्लोमा सोडून अन्य कुठलीही शैक्षणिक पात्रता नाही. तेही केवळ इयत्ता दहावी उत्तीर्ण आहेत. सहाय्यक निर्मिती व्यवस्थापकाला कुठल्याही शाखेतील पदवी ही अत्यावश्यक असताना त्या पदाच्या भरती नियमांत हवे तसे फेरफार करून पोळे यांना बढती दिली आहे.
रंगमेळ प्रमुख म्हणून सेवेतून निलंबित झालेले व्यंकटेश नाईक यांना पुन्हा सेवेत घेताना रंगमेळ प्रमुख पदापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यांनाही पुन्हा पद्धतशीरपणे लगेच रंगमेळ प्रमुख म्हणून बढती देण्याची किमया करण्यात आली आहे. तसेच त्यांना नाटय़ विद्यालयाच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंचवीस वर्षे कनि÷ स्टेनो म्हणून काम केलेल्या महिलेला ’स्टेनो ग्रेड-1’ मिळणे अपेक्षित होते. कारण तिचा अनुभवही फार मोठा आहे. मात्र, त्या जागी काडीचाही अनुभव नसलेल्या कनि÷ स्टेनो क्रांती असोलकर यांना बढती दिली आहे. वास्तवात 25 वर्षे काम केलेल्या महिलेच्या बाबतीत भरती नियम काहीसे शिथिल करता आले असते. पण तसे केले नाही उलट त्याहीपुढे जाऊन कनि÷ कारकून म्हणून काम करणा-या तुळशीदास तळवणेकर यांना भरती नियमांत तीन वेळा बदल करून कनि÷ स्टेनोपदी बढती देऊन तिच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करण्यात आला आहे.
कला अकादमीत वरि÷ कारकून पदावर काम करणाऱया, 18 वर्षांपेक्षा जास्त काम करण्याचा अनुभव व इतर आवश्यक पात्रता असलेल्या आणि ऑफिसच्याच विनंतीवरून सध्या येथील वाचनालयात सहाय्यक ग्रंथपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी पार पाडत असलेल्या महिलेला प्रधान कारकूनपदी बढती नाकारण्यात आली. तिच्या जागी अल्प शैक्षणिक पात्रता असलेल्या व सेवेत रुजू झाल्यापासून फक्त टेलिफोन ऑारेटर म्हणून काम केलेल्या स्नेहा चोपडेकर या महिलेची वर्णी या महत्वाच्या पदावर लावण्यात आली आहे.
सरकारने दखल घेण्याची मागणी
कला व संस्कृतीमंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांना पुर्णपणे अंधारात ठेवून, काही बाबतींत चुकीची व अपूर्ण माहिती पुरवून, जनरल काऊन्सिल व कार्यकारी मंडळाला वेळोवेळी डावलून या गोष्टी केल्याचा आरोप अन्यायग्रस्त कर्मचाऱयांनी केला आहे. या सर्व प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेऊन एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करून गुरुदास पिळर्णकर यांच्या कार्यकाळातील संपूर्ण व्यवहारांची चौकशी करावी व अन्यायग्रस्त कर्मचाऱयांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.