प्रतिनिधी /पणजी
कला अकादमीने आयोजित केलेल्या 52 वी मराठी ‘ब’ गट नाटय़सपर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून सातेरी कला मंदिर, हंसापुर पेडणे, यांनी सादर केलेल्या ‘अधांतर’ या नाटकास पन्नास हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक तर सियावर राम-गिमोणे, पिळगांव-डिचोली यांच्या ‘इथर’ नाटय़प्रयोगास चाळीस हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच श्री भुमिका नाटय़ मंडळ, पर्ये मठ-सत्तरी यांच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकाची तीस हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे तसेच वीस हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रतीक कला पॉडक्शन मौळा भाटी-तिसवाडी यांच्या ‘कालाय तस्मै नमः’ या नाटकासाठी देण्यात आले आहे.
उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक अश्वेश अशोक गिमोणकर यांना इथर या नाटकासाठी प्राप्त झाले असून गोविंद नाईक यांना अधांतर नाटकासाठी द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले तर तृतीय पारितोषिक जयकृष्ण गांवकर यांना सीमेवरून परत जा या नाटकासाठी देण्यात आले.
पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी निलेश नाईक यांना अधांतर नाटकातील बाबा या भुमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून द्वितीय पारितोषिक नारायण भाटवडेकर यांना सीमेवरून परत जा नाटकातील राजे आंभी भुमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रके आदित्य नागवेकर (बच्चु-नाती गोती) दत्ता मडकईकर (विनायकराव-कालाय तस्मै नमः) अमोल दा. नाईक (चंद्रगुप्त-चाणक्य विष्णुगुप्त) विजय बा. परब (माधवराव – ही श्रींची इच्छा), अनिकेत नांगरे (पुरूष – सारी रात्र), विनायक भट प्रभु (कविश ढापणे – असला नवरा नको ग बाई), हनुमंत आजगांवकर (अहिल्यारमण-कस्तुरी मृग), राज चंद्रकांत परब (अशोक – युद्ध नकोमज बुद्ध हवा), राजेंद्र ना. गोसावी (औरंगजेब- शिवांगार) व अविनाश सि. नाईक (अनिकेत- इथर) यांना अभिनयाचे प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे.
स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी सौ. निवेदिता चंद्रोजी यांना अधांतर या नाटकातील आईच्या भुमिकेसाठी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून कु. कन्या रुपेश नाईक यानी कालाय तस्मै नमः नाटकातील शकु या भुमिकेसाठी द्वितीय पारितोषिक संपादन केले. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रके सोनीया शेटये (शैलजा – नाती गोती), सिंथिया गांवकर (रमाबाई – ही श्रींची इच्छा), अंकिता सावंत (स्त्री-सारी रात्र), प्रणिता वि. कळंगुटकर (सुषमा – कालाय तस्मै नमः) निशीता तलवडकर (काकु- टिळक आणि आगरकर), अंकिता गवस (मंजू- अधांतर), रोहिणी कमलाकर (विशाखा – सीमेवरून परत जा), कु. अंकिता गावस (माया – असला नवरा नको गं बाई) यांना अभिनयाचे प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे.
उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे पारितोषिक अखिल च्यारी यांना इथर नाटकासाठी प्राप्त झाले असून विजय कांबळे यांना सारी रात्र नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. शिवांगार या नाटकाच्या प्रकाशयोजनेसाठी रुणाल कोळकणकर यांनी पारितोषिक मिळविले तर प्रशस्तीपत्रक सारी रात्र नाटकासाठी वैभव नाईक यांना देण्यात आले. वेषभूषेसाठीचे बक्षिस प्राची प्रमोद शेटये याना सीमेवरून परत जा नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तीपत्रक मोहनदास च्यारी यांना टिळक आणि आगरकर नाटकासाठी देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठीचे पारितोषिक जवाहर बर्वे यांनी अधांतर या नाटकासाठी प्राप्त केले असून विशाल सावयकर यांना कालाय तस्मै नमः या नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले. रंगभूषेचे पारितोषिक सार्थक परब यांनी सीमेवरून परत जा या नाटकासाठी संपादन केले, तर सागर हळदणकर यांना शिवांगार नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी एकूण 22 प्रवेशिका विविध संस्थांकडून आल्या होत्या त्यातून 16 नाटके सादर झाली. या स्पर्धेचे परीक्षण दिगंबर परब व अभय जोग या परीक्षक मंडळाने केले. पारितोषिकप्राप्त कलाकारांचे कला अकादमीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभाची तारीख मागाहून जाहीर करण्यात येईल. याची नाटय़प्रेमी रसिकांनी व स्पर्धकांनी नोंद घ्यावी असे कला अकादमीतर्फे कळविण्यात आले आहे.