राज्यभरातील 25 नाटय़संस्थांचा सहभाग : मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी /फोंडा
राजीव गांधी कला मंदिर आयोजित स्व. रवींद्र लक्ष्मण नाईक स्मृती दुसऱया अखिल गोवा ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेला काल मंगळवारपासून कला मंदिरच्या मा. दत्ताराम सभागृहात सुरुवात झाली. कला व संस्कृतीमंत्री तथा कलामंदिरचे अध्यक्ष गोविंद गावडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलीत करुन व स्व. रवींद्र नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यभरातील एकूण 25 नाटय़संस्था या स्पर्धेत सहभागी झाल्या असून 11 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. जुन्या कलाकारांनी गावातील हौशी रंगभूमीच्या माध्यमातून ऐतिहासिक नाटकांना वैभव प्राप्त करुन दिले. ही परंपरा टिकवून ठेवतानाच नवीन कलाकारांना या नाटय़परंपरेच्या प्रवाहात आणणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गेल्या वर्षी कारोनाचा प्रभाव असूनही या स्पर्धेत तब्बल 22 संस्थांनी विविध नाटय़प्रयोग सादर केले. यंदा 25 संस्था स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. प्रत्येक नाटकाची संहिता वेगवेगळी असल्याने प्रेक्षकांना या स्पर्धेतून विविध नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे असेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपिठावर कलामंदिरचे उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर, सदस्य सचिव स्वाती दळवी, आयोजन समितीच्या सदस्य गौरी कामत, किरण नाईक, उदय तिळवे हे व्यासपिठावर उपस्थित होते. शांताराम कोलवेकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव प्रभू तर किरण नाईक यांनी आभार मानले. त्यांनतर कालिका थिएटर्स कळंगुट या संस्थेतर्फे ‘शंभूराजे’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात आला.