42 पथकांचा सहभाग : महिला विभागात 17 पथके
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरच्या 13 व्या राज्यस्तरीय व दुसऱया महिला घुमट आरती स्पर्धेला काल मंगळवारपासून कला मंदिरमध्ये सुरुवात झाली. फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत करुन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कला व संस्कृतीमंत्री तथा कला मंदिरचे अध्यक्ष गोविंद गावडे, उपाध्यक्ष तथा फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, ज्येष्ठ लोककलाकार प्रकाश नाईक व कला मंदिरचे संचालक व्यासपीठावर उपस्थित होते.
राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेत 42 तर महिला विभागातील स्पर्धेत 17 पथकांनी भाग घेतला आहे. येत्या 16 ऑक्टोबरपर्यंत सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात ही स्पर्धा चालणार आहे. अंतिम फेरी व बक्षीस वितरण सोहळा 17 रोजी होणार आहे. कला व सांस्कृतिकदृष्टय़ा गोवा हा श्रीमंत प्रदेश आहे. स्पर्धेच्या माध्यमातून कलाकारांना पुढे येण्याची संधी मिळते. तसेच कलेची देवाणघेवाण होण्यास मदत होते, असे आमदार रवी नाईक यावेळी बोलताना म्हणाले.
पुढच्या वर्षीपासून बाल घुमट आरती स्पर्धा
घुमट वाद्य हे जगातील एक वेगळय़ाच पद्धतीचे वाद्य आहे. गोव्याचे लोकवाद्य म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे. घुमट आरती व संगीत क्षेत्रात गावागोवी नवीन कलाकार घडले पाहिजेत. कलेला जात धर्माची बंदने नसतात असे सांगून पुढच्या वर्षीपासून कला मंदिरतर्फे बाल कलाकारांसाठी घुमट आरती स्पर्धेची घोषणा मंत्री गोविंद गावडे यांनी केली. शांताराम कोलवेकर यांनी घुमट हे गोव्याचे संस्कृतीचे वैशिष्टय़ असल्याचे नमूद केले. प्रकाश नाईक यांचेही यावेळी भाषण झाले.