मंत्री गोविंद गावडे यांचे प्रतिपादन : कला व संस्कृतीमुळेच गोव्याचे जगाच्या नकाशावर नाव : डिचोलीत शिमगोत्सवाचे उदघाटन
प्रतिनिधी /डिचोली
राज्याच्या सांस्कृतिक व पारंपरिकतेचा वारसा हा शिमगोत्सव आहे. ही पारंपरिक कला एका पिढीकडून दूसऱया पिढीकडे पोहोचविताना नवीन पिढीचा जास्तीत जास्त सहभाग या कलेच्या माध्यमातून व्हावा. यासाठी सरकारी पातळीवर सार्वजनिक शिमगोत्सव आयोजन करण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
आज गोव्याची अनन्यसाधारण संस्कृती व कला यामुळे या राज्याचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. ते अबाधित ठेवण्यासाठी नव्या पिढीने हि जबाबदारी आपल्य खांद्यावर घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी डिचोली येथे केले.
डिचोली शिमगोत्सव समितीतर्फे डिचोलीत आयोजित शिमगोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ात मंत्री गोविंद गावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, नगरसेवक अनिकेत चणेकर, नीलेश टोपले, गुंजन कोरगावकर, दीपा शिरगावकर, ऍड. रंजना वायंगणकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी आमदार तथा डिचोली शिमगोत्सव समातीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी डिचोली ही कलाकारांची खाण असल्याने या शहरात शिमगोत्सवासारखा कलेचा उत्सव होत नसल्याने काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. व डिचोलीवासीयांच्या आग्रहा खातर डिचोलीत शिमगोत्सव घडवून आणण्याचा संकल्प केला. सर्वांच्या सहकार्याने हा शिमगोत्सव साजरा होत आहे. हेच सहकार्य डिचोली मतदारसंघातील जनता मतदारसंघाच्या सर्वांगीण कायापालट करण्यासाठी करणार. डिचोलीच्या विकासासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
गोव्यात दोन वर्षांनंतर शिमगोत्सव होत असून या जगावर आलेल्या संकटाचा नाश होत अशा प्रकारचे उत्सव सुरळीतपणे घडत रहावे. डिचोली व मयेचे अतूट नाते असून हे नाते असेच अबाधित राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आपल्या भाषणात म्हटले. समई प्रज्वलित करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत बाबी पळ यांनी केले. सूत्रसंचालन राजन कडकडे यांनी केले. तर आभार नारायण बेतकीकर यांनी मानले.