गुहागर-चिपळूण मार्गावरील तांबी पुलावर थांबून आस्थेने चौकशी
प्रतिनिधी/ चिपळूण
रामपूर हायस्कूलच्या मैदानावरील कार्यक्रम आटोपून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह निघालेला वाहनांचा ताफा तांबी नदी पुलावर अचानकपणे थांबला. शिवसेनेची टोपी घालून कलिंगड विक्री करणारे शिवसैनिक पाहून ठाकरे हे त्यांच्याजवळ गेले आणि त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्याकडून मिळालेले प्रेमाचे कलिंगड भेट घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले. मात्र त्यांच्या या कृतीचे अनेकांना नवल वाटले.
तांबी नदीच्या पुलाजवळ रामपूर-रावळगांव येथील काहीजणांनी कलिंगडचे ढेले लावले आहेत. तांबी धरणाचे पाणी आणि तेथील निसर्गरम्य वातावरण यामुळे चिपळूण-गुहागर मार्गावर प्रवास करणारे याठिकाणी सर्रासपणे थांबतात. शनिवारी रामपूर येथून निघताना ठाकरे यांच्या गाडय़ांचा ताफा सुस्साट चिपळूणकडे चालला होता. पुलावर त्यांना गाडीतूनच शिवसेनेची टोपी घालून बसलेले शिवसैनिक दिसले. त्यांनी विक्रांत जाधव यांच्याकडून माहिती घेत असतानाच गाडी थांबवली. पुलाच्या पुढेच गाडी अचानकपणे थांबल्याने मागील गाडय़ांतील पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पोलिसांना काहीच कळेनासे झाले. गाडीतून उतरून चालतच ठाकरे हे या शिवसैनिकांपर्यत आले.
या शिवसैनिकांकडून त्यांनी माहिती घेताना ही कलिंगड कुठे करता, कशी आणता, कुठे कुठे विक्री करता, किती दर मिळतो याबाबतची आस्थेने चौकशी करत माहिती घेतली. शिवसेनेचे युवा नेतृत्व जवळ येऊन विचारपूस करते याचे नवल सर्वाना वाटले. त्यांनी प्रेमाने ठाकरे यांना कलिंगड भेट दिले. त्यानंतर ठाकरे हे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. ठाकरे यांच्या या अचानक भेटीने शिवसैनिक आश्चर्यचकीत झाले, शिवाय त्यांच्या या कृतीचे कौतुकही केले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मौन
सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. शनिवारी चिपळूण दौऱयावर आलेल्या शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबत पत्रकारांनी छेडले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी कोकणात एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आलोय, या प्रकरणात थोडी माहिती घेऊन नंतर बोलतो असे सांगत या विषयावर बोलणं टाळलं.