शिव-बसव जयंतीनिमित्त अजित-अजिंक्य औरवाडकर यांचा उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
यंदा लॉकडाऊनमुळे शिव-बसव जयंती साधेपणाने मात्र उत्साहात घरोघरी साजरी करण्यात आली. काही शिवभक्तांनी अर्थपूर्णरित्या जयंती उत्सव साजरी केली आहे. नाझर कॅम्प वडगाव येथील रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी विविध कडधान्याचा वापर करून छत्रपती शिवरायांची प्रतिकृती साकारली आहे. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. तर त्यांचे सुपुत्र अजिंक्य औरवाडकर याने कलर पेन्सिलमधून विश्वगुरु बसवेश्वर महाराजांचे भावचित्र रेखाटून कलेच्या माध्यमातून या महापुरुषांची जयंती साजरी केली आहे.
अजित औरवाडकर यांनी शिवरायांचे भावचित्र रेखाटण्यासाठी हरभराडाळ, तूरडाळ, मूगडाळ, मसूरडाळ, जोंधळा, गहू, तांदूळ, साबुदाणा, मटार आदी कडधान्यांचा वापर केला आहे. यासाठी त्यांना 8 तासांचा कालावधी लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही अनोखी रांगोळी 2ƒ3 फूट आकाराची आहे. तर अजिंक्यने कलर पेन्सिलमधून बसवेश्वरांचे 12ƒ15 इंचांचे भावचित्र रेखाटले आहे. यासाठी त्याला 7 तास लागले आहेत.