पुणे / प्रतिनिधी :
नृत्य करण्यासाठी मन एकाग्र करुन साधना करीत असताना प्रचंड ऊर्जा आवश्यक असते. ती मन:शांती श्री दत्तस्मरणाने आम्ही साध्य करतो. कोणत्याही कलेच्या साधनेमध्ये गुरुपरंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर नृत्यसाधना करण्यास लागणारी ऊर्जा आम्हाला प्राप्त होते, असे मत कथक नृत्यातील पं. मनीषा साठे यांच्या कन्या प्रसिद्ध नृत्यांगना शांभवी साठे-दांडेकर यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दांडेकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे आदी उपस्थित होते.
अमेरिकेतील शांभवी इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक च्या शांभवी साठे-दांडेकर या मुख्य संचालिका आहेत. त्या अमेरिकेतून पुण्यात आलेल्या असताना दत्तमंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन त्यांच्या भारतासह अमेरिकेत सुरु असलेल्या कला क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव देखील करण्यात आला.