सावंतवाडी प्रभारी सभापती शीतल राऊळ यांचे पाऊल
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी पंचायत समितीचे प्रभारी सभापती शीतल राऊळ यांनी पदभार स्वीकारताना पंचायत समितीच्या शिरोडा नाका येथील कार्यालयाजवळ एक कल्पवृक्ष लावला. राऊळ यांनी यानिमित्त एक नवा पायंडा घातला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे अधिकारी व कर्मचाऱयांनी कौतुक केले.
सभापती मानसी धुरी यांनी सव्वा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांकडे राजीनामा दिला. या रिक्तपदाचा कार्यभार उपसभापती शीतल राऊळ यांच्याकडे गेला आहे. नवीन सभापती निवड होईपर्यंत आणखी काही दिवस राऊळ हे कार्यभार सांभाळणार आहेत. ते बांदा पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आले आहेत. पंचायत समितीवर भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांची उपसभापतीपदी वर्णी लागली होती.
राऊळ सोमवारी पंचायत समितीच्या कार्यालयात दाखल झाले. अधिकाऱयांच्या आग्रहाखातर ते सभापतीपदाच्या खुर्चीवर बसले. पदभार स्वीकारताच त्यांनी अधिकारी व कर्मचाऱयांना बोलावून घेऊन पंचायत समितीच्या आवारात एक कल्पवृक्ष लावला. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाची आहे. एक तरी झाड आपण सर्वांनी लावू, अशी शपथ घ्यावी, असे स्पष्ट केले. यावेळी गटविकास अधिकारी विनायक नाईक, विस्तार अधिकारी दत्ता गायकवाड आदींनी राऊळ यांचे स्वागत केले.
राऊळ म्हणाले, पंचायत समितीत येणाऱया प्रत्येक नागरिकाच्या अडचणी व समस्या यांचा निपटारा व्हायला हवा. नवीन इमारतीचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल. यासाठी आपण प्रयत्नशील राहू.