ब्रेन स्ट्रोकनंतर लोहिया रुग्णालयात दाखल – योगी आदित्यनाथ यांनी घेतली भेट
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांची प्रकृती बिघडली आहे. शनिवारी संध्याकाळी ब्रेन स्ट्रोक आणि त्यानंतर मायनर हार्ट अटॅक आल्यावर त्यांना लखनौच्या राम मनोहर लोहिया आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती नाजुक असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. पण कल्याण सिंग हे योगींना ओळखू शकले नाहती.
27 जून रोजी कल्याण सिंग यांना पॅरोटेड ग्लँडमध्ये संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते. याचदरम्यान त्यांना शनिवारी रात्री ब्रेन स्ट्रोक झाला. कल्याण सिंग सध्या लोकांना ओळखू देखील शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांशी बोलतानाही ते त्यांना ओळखू शकले नाहीत. मुख्यमंत्री योगींनी त्यांची विचारपूस केली, पण कल्याण सिंग प्रतिसाद देऊ शकले नाहीत अशी माहिती लोहिया हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. विक्रम यांनी दिली आहे.
प्रदीर्घ राजकीय प्रवास
कल्याण सिंग हे जून 1991 मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. भाजपच्या प्रभावी नेत्यांपैकी एक असलेले कल्याण सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच बाबरी ढाँचा पाडविण्यात आला होता. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून 6 डिसेंबर 1992 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कल्याण सिंग सप्टेंबर 1997 ते नोव्हेंबर 1999 पर्यंत पुन्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. बाबरी प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीलाही तोंड दिले आहे. पण सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते.
राजस्थानचे माजी राज्यपाल
कल्याण सिंग हे राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले आहेत. 4 सप्टेंबर 2014 पासून 8 सप्टेंबर 2019 पर्यंत ते राजस्थानचे राज्यपाल होते. त्यानंतर जानेवारी 2015 मध्ये हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांना सोपविण्यात आला होता.