प्रतिनिधी / म्हापसा
कळंगुटला शहरीकरणाचा दर्जा देण्याचा निर्णय माझा नसून सरकारी अध्यादेशानुसार आहे. मी फक्त त्या अध्यादेशाची पूर्तता करण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतु, मला निवडून दिलेल्या मतदारांना जर कळंगुटचे शहरीकरण नको असेल तर अध्यादेश रद्द करण्यासाठी मी स्वतः सर्वप्रथम भूमिका घेईन, असे कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुट येथे सांगितले.
हरित कळंगुट योजनेतर्गत आयोजित एका विशेष कार्यक्रमात स्थानिक शेतकऱयांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ट्रक्टरचे स्थानिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच फीत कापून उद्घाटन केले. या प्रसंगी मंत्री लोबो बोलत होते.
सुदेश मयेकरांचे आरोप वैफल्यग्रस्तेतून
त्यांचेच जवळचे सहयोगी असलेले कळंगुटचे माजी उपसरपंच तथा कळंगुट किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी त्यांना उद्देशून केलेल्या हीटलरशाही असा उल्लेख करून केलेल्या आरोपांसंदर्भात मंत्री लोबो यांना छेडले असता, मयेंकर यांना कळंगुटचे सरपंचपद नाकारल्यामुळे वैफल्यग्रस्त बनल्याचा आरोप लोबोंनी केला. पंचायत मंडळाच्या करारानुसार वेळोवेळी सरपंच बदलत असतात या घडामोडीत आपला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कुठलाच हस्तक्षेप नसतो परंतु मयेकर यांना खुद्द पंचायत मंडळाकडूनच सरपंचपदासाठी नाकारण्यात आल्याने त्यांची संधी हुकली.
दरम्यान, मयेंकर यांनी याबाबतीत आपल्याला प्रत्यक्ष भेटून सरपंच बनविण्याची गळ घातली होती; मात्र पंचायत मंडळाच्या निर्णयामुळे आपण त्यांना याबाबतीत थोडी कळ सोसण्याची विनंती केली होती. तथापि मयेकर यांनी या गोष्टीचा राग मनात राग धरून वैफल्यग्रस्त होऊन आपल्याला हिटलरची संबोधल्याचे मंत्री लोबो यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र सुदेश मयेकर आपल्याच हितचिंतकांच्या गटातील असल्याने लवकरच त्यांचे मनपरिवर्तन नक्की होईल, असा विश्वास मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केला.