संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे : कांदोळीतील बंजारा समाजाची मते निर्णायक ठरणार.आप, तृणमूल काँग्रेसचीही कडवी झुंज
प्रतिनिधी /म्हापसा
कळंगूट मतदारसंघाकडे तमाम गोव्याचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात आता मुख्यमंत्र्याची स्वप्ने पाहणारे माजी मंत्री विजयी होऊन हॅट्रिक साधतात की, जोसेफ सिक्वेरा किंग मेकर होत कळंगुटमध्ये नवीन इतिहास निर्माण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कळंगुटमधून लोबो विजयी झाल्यास बार्देशमधून नवीन राजकारणाला सुरुवात होणार आहे. या मतदारसंघाचा 50 वर्षांचा आढावा घेतला तर या मतदारसंघात दोन वर्षापेक्षा अधिक काळ अद्याप कुणीही आमदार झाला नाही. माजी मंत्री मायकल लोबो यंदा हॅट्रिक साधतात की आऊट होतात याकडे तमाम गोमंतकीयांचे लक्ष लागून आहे. मायकल लोबो (काँग्रेस), जोसेफ सिक्वेरा (भाजप), सुदेश मयेकर (आप), अँथनी मिनेझीस (तृणमूल) असे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. लोबो व सिक्वेरा पुन्हा एकदा आमने सामने आले आहे. फरक एवढाच दोघांची चिन्हे यावेळी उलट आहेत. हिंदू मतदार व सर्वसामान्य जनता लोबोबरोबर आहे. या मतदारसंघात ख्रिश्चन बांधवांची मते कोणाच्या बाजूनी कौल देतात आणि विशेषतः कांदोळी येथे असलेली बंजारा समाजाची सुमारे 5 हजार मते कुणाच्या बाजूनी वळतात त्याचेच नशीब आगामी निवडणुकीत उघडणार आहे, हे गुरुवारी कळणार आहे.
लोबोनी दहा वर्षे या मतदारसंघात कार्य केले आहे. त्यांची मतदारांशी अपुलकी जोडणारी एक वेगळी शैली आहे. त्यांनी स्वतःची एक वेगळी फळी निर्माण केली आहे. भाजपची जी मते ती लोबोंच्या की सिक्वेरा यांच्याबाजूने कौल देतात यावर दोघांपैकी एकाचे नशीब उघडणार आहे. दोघेही हेवी वेट राजकारणी असून भाजपने आपल्या चालीत जोसेफना भाजपची तिकीट दिल्याने लोब्नेची थोडीफार राजकीय समीकरणे बदलली. लोबोंचा पराभव करणे हे भाजपचे मिशन असून त्यासाठी पक्ष कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. शिवोलीतून दयानंद मांद्रेकर, साळगावातून जयेश साळगावकर, दिलीप परुळेकर, म्हापशातून जोशुआ डिसोझा, हळदोणातून ग्लेन टिकलो, पर्वरीतून रोहन खंवटे या नेत्यांनी लोबोंचा पराभव करण्यासाठी अस्त्र हाती घेतले आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे आगामी काळ सांगणार आहे.
राज्यात सर्वांचे लक्ष कळंगूट मतदारसंघाकडे लागून आहे. मायकल लोबो यांनी सलग 10 वर्षे येथे आमदार म्हणून राज्य केले. ते तिसऱयांदा निवडून आल्यास कळंगुटमध्ये हा एक नवीन विक्रम होणार आहे. आजवर या मतदारसंघात दोन पेक्षा अधिक वेळ आमदार म्हणून निवडून आलेला नाही. मायकल लोबो (भाजपा) म्हणून या मतदारसंघात 2012 व 2017 च्या निवडणुकीत निवडून आले. विशेषतः 2017 साली निवडून आल्यानंतर अवघ्या वर्षभराच्या कालावधीत लोबोनी सरकारविरोधात थेट आरोप करण्यास सुरुवात केली. यामुळे सरकार पातळीवर ते जड गेले. यादरम्यान स्व. पर्रीकरांच्या निधनानंतर त्यांना कचरा व्यवस्थापन मंत्रीपद बहाल करण्यात आले. लोबोच्या उघड आरोपामुळे सरकारला ते डोकेदुखी झाले. त्यांनी निवडणुकीला अवघे सहा महिने असताना शिवोली मतदारसंघातून आपली पत्नी डिलायला लोबो निवडणूक रिंगणात अतरणार असे जाहीर केले. त्यामुळे शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर संतप्त झाले. येथूनच राजकारणाला सुरुंग लागला आणि लोबोनी पक्षाविरोधात खुलेआम बोलणे सुरू केले. असे असले तरी लोबोना मंत्री मंडळातून काढून टाकण्याचे धाडस मात्र कुणालाही झाले नाही. शेवटी आचारसंहिता लागल्यावर लोबो पती – पत्नीनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आज मायकल लोबो (काँग्रेस) भाजप विरोधात कळंगुटमध्ये रिंगणात उभे आहे. भाजपच्या तिकिटावर लोबोनी 2017 च्या निवडणुकीत 11136 मते मिळविली होती तर जोसेफना 7311 मते मिळाली होती तेव्हा लोबो 3825 अधिक मते घेऊन विजयी झाले होते. यावेळी दोघेही एकामेकाविरोधात पुन्हा एकदा रिंगणात आहेत मात्र पक्षचिन्ह गेल्यावेळच्या तुलनेत पूर्णतः विरोधात आहे.
आपवर कळंगुटचे भवितव्य
आप पक्षातर्फे कळंगुटमध्ये पंच सदस्य सुदेश मयेकर रिंगणात आहे. मयेकर हे एकेकाळचे लोबो यांचे खंदे समर्थक आहेत. मात्र आज दोघेही एकामेकांविरोधात रिंगणात आहे. राजकारणाची चाल कशी खेळावी हे मयेकर, लोबोंकडूनच शिकले आहे मात्र तीच चाल लोबोवर उलटते की लोबो आपल्या वेगळ्य़ा चालीत यशस्वी होतात हे आगामी काळच सांगणार आहे. 2017 च्या निवडणुकीत गॉडवीन फर्नांडिस यांना त्यावेळी 1465 मते प्राप्त झाली होती ती मते आणि पंच म्हणून मयेकर किती मते मिळवितात यावर लोबोंचे भवितव्य अवलंबून आहे.
तृणमूलतर्फे अँथनी मिनेझीस रिंगणात आहेत. ते माजी जिल्हा पंचायत सदस्य आहे. त्यांचा वावरही या मतदारसंघात आहे. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस त्यांच्याबरोबर आहेत. हे दोघेही किती मत परिवर्तन करतात यावर अँथनीचे भवितव्य अवलंबून आहे. तृणमूल कळंगुटसाठी नवीन पक्ष आहे. अशावेळी लोकांचा कौल कितपत मिळतो यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.