कर्नाटकातून पुण्याकडे जात असताना झाला अपघात
प्रतिनिधी / सोलापूर
उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावाजवळ सुरु असलेल्या बाह्य वळण रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री 1.30 च्या कारचा अपघात झाला. या भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. कर्नाटकातील चार तरुण फिरण्यासाठी पुण्याकडे निघाले होते. रस्त्याच्या पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने कार पुलाच्या कामाला जोरात धडकली. अपघात इतका भीषण होता की कारचे दरवाजे आणि काचा पाहरीने फोडून पोलिसांनी जखमी तरुणांना बाहेर काढले. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एकाचा प्राण वाचविण्यात त्यांना यश आले.
अरुणकुमार लक्ष्मण यकंची (वय 21, रा. यरगल केटी, ता. सिंगदी कर्नाटक) ,महिबूब महमद अली मुल्ला (वय 18, रा. यरगल बीके, सिंदगी जि. विजयपूर), फिरोज सैपनसाब शेख (रा. गवसावळगी ता. सिंदगी जि. विजयपूर) व मुन्ना केंभावे (गवसावळगी ता. सिंदगी जि. विजयपूर) अशी मृत झालेल्या तरुणांची तर पैंगबर नजीर मुल्ला (रा. गवसावळगी ता. सिंदगी जि. विजयपूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री हे सर्व तरुण के ए 32/2484 क्रमांकाच्या कारमधून पुणेकडे जाण्यासाठी निघाले होते दरम्यान हा अपघात झाला.