ऍग्रेसिव्ह गोवनतर्फे कारवाईची मागणी
प्रतिनिधी / फोंडा
कवळे येथे बेकायदेशीररित्या डोंगर कापून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले असून काही झाडांचीही कत्तल करण्यात आल्याची तक्रार ऍग्रेसिव्ह गोवन या बिगर सरकारी संस्थेने केली आहे. लॉकडाऊनच्या काळात गुपचूपणे हे काम सुरु होते. फोंडा उपजिल्हाधिकारी, नगरनियोजन खाते, वनखाते व कवळे ग्रामपंचायतीकडे त्यासंबंधी लेखी तक्रार करण्यात आली असून या बेकायदेशीर कामात गुंतलेल्याविरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ऍग्रेसिव्ह गोवनचे सदस्य संतोष तारी व ओंकार नाईक यांनी ही तक्रार केली आहे. कवळे ग्रामपंचायत कार्यालयापासून जवळच काही घरांची लोकवस्ती असलेल्या भागात 9 ते 12 मे या काळात बेकायदेशीररित्या हा डोंगर कापून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी जेसीबी मशिन व मातीची वाहतूक करण्यासाठी ट्रकांचा वापर करण्यात आला होता. या डोंगर कापणीमुळे पावसाळय़ात बाजुची दरड खचून नैसर्गिक आपत्ती घडण्याचा धोका असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. डोंगर कापून मोठय़ा प्रमाणात उपसण्यात आलेली माती सध्या सुरु असलेल्या फर्मागुडी ढवळी महामार्गाच्या कामात भराव टाकण्यासाठी वापरली जात आहे. ज्या ठिकाणी डोंगर कापण्याचे हे काम चालले होते, त्याठिकाणी परवानगीचा फलक उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे ते बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहे, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
या डोंगर कापणीसंबंधी दक्षिण गोव्यातील भरारी पथकाला फोनवर कळवून त्यासंबंधी तक्रार नोंदविण्यात आली आहे. शिवाय या कामात गुंतलेले जेसीबी मशिन व ट्रकांचा क्रमांकही पाठविण्यात आला आहे. या बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करताना डोंगर कापण्यात आलेल्या जागेत पुन्हा मातीचा भराव टाकून ही जागा समपातळीवर आणण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. दरम्यान फोंडा वनखात्यातर्फे या बेकायदेशीर कामात गुंतलेले जेसीबी मशिन व एक ट्रक जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.