दोन अड्डे चालकांसह सात जणांना अटक : पाऊणवाडा कवळे ग्रामस्थ सुखावले
प्रतिनिधी /फोंडा
पाऊणवाडा-कवळे येथे रस्त्याशेजारी भरवस्तीत असलेल्या दोन बेकायदेशीर दारू अड्डय़ावर छापा ठोकून एकूण सात जणांना फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यांकडून सुमारे रू. दहा हजारांचा दारू साठा जप्त करण्यात आला. चहा दुकान व एका गॅरेज अशा दोन ठिकाणी मारलेल्या या छाप्याची कारवाई गुरूवार उशिरा रात्री करण्यात आली.
याप्रकरणी विना परवाना दारू विक्री करणारा चहा दुकानदार महेश गजानन नाईक (48, पाऊणवाडा कवळे), गॅरेजचालक रोहिदास श्रीकांत नाईक (56,पाऊणवाडा कवळे), तसेच दारू पिण्यासाठी आलेले गिऱहाईक हरिष साजरो शेट (36, फेरी पॉईंट दुर्भाट),दिनेश गजानन नाईक (38,पाऊणवाडा कवळे), प्रदीप बाळकृष्ण नाईक(45, आगापूर), सनी सुभाष नाईक(31, आगापूर), सुरेंद्र सुरेश मोडगेकर (34, सिमेपाईण म्हार्दोळ) अशी त्याची नावे आहेत. सातही जणाविरोधात भा.द.सं. 188 व 269 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊन संचारबंदी नडली
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्य़ासाठी लॉकडाऊन जारी केलेला असतानाही सर्रास दारू विक्रीचा व्यवसाय मागील काही महिन्यापासून सुरू होता. अबकारी खात्याने याकडे कानाडोळा करण्यात आल्यामूळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले होते. बेकायदेशीरित्या सायंकाळी 7 वा. नंतर गॅरेज व चहा दुकानात मागील दारू विक्री व्यवसाय सर्रास सुरू होता. बेकायदेशीर दारू अड्डय़ाला प्रोत्साहन देणारे सर्वाच्या परिचयाचे असल्यामुळे नागरिकही हतबल बनले होते. वारंवार ग्राममसभेत प्रश्न उपस्थित करूनही कोणतीच पाऊले उचलत नव्हती. रोज उशिरा रात्रीपर्यंत सुरू असलेल्या दारू अड्डे चर्चेचा विषय ठरले होते. मात्र पोलिसांनी संचारबंदीचा फायदा उठवत सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. लॉकडाऊन संचारबंदीची कारवाईच या बेकायदेशीर दारू अड्डय़ाला नडली असा सुर काही ग्रामस्थ आवळत होते.
सातनंतर सर्रास दारूविक्री, युवकांचा जास्त सहभाग
दोन्ही ठिकाणी झालेल्या छापासत्राच्या कारवाईमूळे पोलिसांच्या मदतीने सदर व्यवसाय चालत असल्याच्या तक्रारीनांही पुर्णविराम मिळालेला आहे. राज्यभरातील बार व्यवसाय होलसेल पार्सल सर्व्हीस सायंकाळी 7 च्या डेडलाईनमुळे थंडावला असून अशा गैरप्रकारांना ऊत मिळत आहे. या कारवाईमुळे अनेकांचे आजूबाजूच्या परीसरातील धाबे दणाणले आहेत. यापुर्वी कवळे ग्रामस्थांनी सन 2011 सालापासून वारंवार पंचायतीकडे सहय़ानिशी लेखी निवेदन सादर करून या परिसरात दारू विक्रीला प्रोत्साहन व परवानगी पंचायतीने देऊ नये असे कळविले होते. अबकारी खात्याकडूनही अशी परवानगी दिल्यास ग्रामस्थांचा विरोध कायम राहणार असल्याचा पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यामुळे भविष्यात या भागात मद्यालयासाठी परवाना देऊ नये तसेच या भागात कार्यरत असलेल्या विनापरवाना दारू अड्डय़ावर चौकशी करावी अशी मागणीही केली होती.
फोंडय़ाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज काणकोणकर, हवालदार केदारनाथ जल्मी, अमेय गोसावी, संदीप नाईक, वंदेश सतरकर यांनी ही कारवाई केली असून हवालदार रघुनाथ गावस पुढील तपास करीत आहे. कारवाईमुळे मागील दहा वर्षापासून पंचायत ग्रामसभेत विविध छुप्या मार्गाने सुरू असलेल्य़ा बेकायदेशीर दारूविक्रीप्रकरणी आवाज उठविणाऱया जागृत ग्रामस्थांनी फोंडा पोलिसांचे कौतुक केले आहे, काही अतिउत्साही लोकांनी सोशल मिडीयावरही छापासत्राचे चित्रीकरण व्हायरल करून आनंद साजरा केला आहे.