प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अनुसया हॉटेलनजीक दुचाकी एसटी बसवर आदळून झालेल्या अपघातात विजय प्रकाश जाधव (21, चोरवणे-उतेकरवाडी) हा जागीच ठार झाला असून अन्य 2 सहकारी जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडला.
रोहित रंगराव जाधव (20, भरणे), तुषार दीपक जाधव (21, चोरवणे) अशी जखमींची नावे आहेत. एस.टी. बस चालक दत्ताराम बाळकृष्ण महाडिक (45 गुहागर डेपो) हे एम.एच. 20/ बी.एल. 1574 क्रमांकाची बस घेवून गुहागर येथून मुंबईला जात होते यावेळी कशेडी घाटात महाडहून खेडच्या दिशेने येणारी दुचाकी चुकीच्या बाजूने जावून एस.टी. बसवर आदळली. दुचाकीवरून तिघेजण प्रवास करत होते. अपघातात दुचाकीस्वार विजय जाधव जागीच गतप्राण झाला व अन्य दोघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बोडकर, पोलीस कर्मचारी समेल सुर्वे, दाभोळकर, जाधव, चिकणे आदींसह कशेडी येथील देवदूत पथकाचे मुकुंद मोरे, महेश रांगडे, सहदेव कदम घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने उपचार्थ कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. खेड आगारप्रमुख प्रशांत करवंदे, एन. जे. जाधव हे देखील अपघातस्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तब्बल साडेतीन तासानंतर खेड आगाराच्या बसने प्रवासी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले.