दुसऱया क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरचा अमित करंडे घुटना डावावर विजयी
वार्ताहर /चापगाव
कसबा नंदगड येथील व्हन्नव्वादेवी यात्रोत्सवानिमित्ताने मंगळवारी आयोजित कुस्ती मैदानात पुण्याचा पै. महारुद्र काळेल व हरियाणाचा पै. विशाल यांच्यात कडवी लढत झाली. पण तब्बल 45 मिनिटाच्या लढतीनंतर गुणावर कुस्ती निकाली करण्यात आली. पै. महारुद्र काळेलने पहिला गुण घेत या मैदानाचा मानकरी ठरला. दुसऱया क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरचा पै. अमित करंडे याने दिल्लीच्या पै. संदीप याच्यावर अवघ्या 15 मिनिटात घुटना डावावर विजय मिळवला.
प्रथम क्रमांकाची कुस्ती रात्री 8.45 वाजता तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर, श्री व्हन्नव्वादेवी आखाडय़ाचे अध्यक्ष व भाजप नेते विठ्ठल पाटील, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, उद्योजक शरद केशकामत, काँग्रेस नेते महांतेश कल्याणी, लैला शुगर्सचे व्यवस्थापक सदानंद पाटील, ग्राम पंचायत अध्यक्ष प्रवीण धबाले, मल्लाप्पा मारीहाळ महांतेश वाली, ग्राम पंचायत सदस्य प्रवीण पाटील आदींच्या हस्ते लावण्यात आली. एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतल्यानंतर दोघांनी हाताची पकड घेऊन एकमेकाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. दहाव्या मिनिटाला पै. विशाल याने छडी लावून आखडी डावावर महारुद्रला ताब्यात घेतले, पण महारुद्रने चलाखीने सुटका करून घेतली. चाळीस मिनिटे उलटली तरी दोन्ही पैलवानांनी सावध पवित्रा घेत रडीचा खेळ केला. अखेर उपस्थित कुस्ती शौकिनांनी निकालाची अपेक्षा करून पंचांनी पाच मिनिटे वेळ दिला. पण पंचेचाळीस मिनिटानंतर गुणावर निकाल लावण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 50 व्या मिनिटाला महारुद्र काळेल याने पै. विशालवर ताबा मिळवून पहिला गुण मिळवल्यानंतर त्याला विजयी घोषित करण्यात आले. या कुस्तीसाठी पंच म्हणून कुस्ती कोच बाळासाहेब सुतार, तसेच मधु पाटील यांनी काम पाहिले.
दुसऱया क्रमांकाची कुस्ती पै. अमित करंडे व दिल्लीचा पै. संदीप यांच्यात झाली. सदर कुस्ती महालक्ष्मी तोपिनकटी ग्रुपचे उपाध्यक्ष विठ्ठल करंबळकर, सचिव तुकाराम हुंदरे, लैलाचे व्यवस्थापक सदानंद पाटील, विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील व त्यांच्या सहकाऱयांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पै अमित करंडेने चटकदार कुस्ती खेळत पंधराव्या मिनिटाला घुटना डावावर पै संदीप दिल्ली याच्यावर कब्जा मिळवला व क्षणातच त्याला चितपट करून विजयाचा मानकरी ठरला. या कुस्तीसाठी पंच म्हणून डी. एम. भोसले यांनी काम पाहिले. तिसऱया क्रमांकाच्या कुस्तीत सोलापूरचा पै. ल्sिंागराज होनमाने याने दिल्लीच्या पै. नवीन कुमार याच्यावर घुटना डावावर विजय मिळविला. जिल्हा पंचायत माजी सदस्य विशाल पाटील, सिद्धोजी पाटील ग्रामपंचायत समितीच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत कोल्हापूरचा पै. कीर्तिकुमार याने दर्गा तालमीचा पै. आप्पासाहेब इंगळगी याच्यावर विजय मिळवला तर पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत कार्तिक इंगळगीने रोहित लहान कंग्राळी याच्यावर विजय मिळवला. त्याचप्रमाणे बेकवाडचा विनायक गुरव, पै. रामाण्णा हल्याळ, पै. प्रवीण निलजी असे अनेक पैलवान विजयी ठरले. या दोनच कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या. मेंढय़ाच्या कुस्तीत कसबा नंदगडचा पै. ऋषिकेश हा विजयी ठरला.
या कुस्ती आखाडय़ाचे पूजन खानापूरचे आमदार अंजली निंबाळकर यांच्या तर दीपप्रज्वलन हलग्याचे गोपाल महाराज, माजी आमदार दिगंबर पाटील, भाजप नेते शरद केशकामत, जिल्हा पंचायत माजी सदस्य विलास बेळगावकर यांच्या हस्ते झाले.
आखाडय़ाचे उद्घाटन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते तर विविध दैवतांच्या प्रतिमांचे पूजन लैलाचे व्यवस्थापक सदानंद पाटील, उद्योजक नासीर बागवान, शंकर पाटील आदींच्या हस्ते झाले. आखाडय़ात देणगीदारांचा तसेच आखाडा बनवण्यासाठी परिश्रम केलेल्या कमिटीचा जाहीर सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी, विविध कुस्ती संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कुस्त्यांचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे, सुहास पाटील चनेवाडी, पत्रकार आप्पाजी पाटील यांनी केले. कुस्त्या पाहण्यासाठी श्री व्हन्नव्वादेवी आखाडय़ात हजारो कुस्ती शौकिनांनी उपस्थिती दर्शवली होती.