कसबा बीड /प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द, कोगे, महे, कसबा बीड परिसरात व श्री क्षेत्र सातेरी महादेव मंदिर येथे महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कसबा बीड येथील प्राचीन बीडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर पारायण, प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सात दिवस अखंड वीणा वादन सुरू होते. महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी बीडेश्वरास दुग्धाभिषेक व आरतीनंतर मुकुट- मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हर हर महादेवच्या गजरात पालखी नगर प्रदक्षिणा साठी सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम वाद्य वारकरी आणि पालखी असा क्रम करून शंकराची आरती करण्यात आली. हर हर महादेव गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण भजन सेवेकर यांचा लवाजम्यासह पालखी तुळशी भोगावती नद्यांच्या रुद्र संगमावर नेण्यात आली. तेथे रुद्रप्रयाग संगमाच्या पवित्र पाण्याने उत्सवमूर्ती जलाभिषेक गेल्यानंतर आरती करून हर हर महादेव च्या गजरात पालखी मंदिराकडे प्रस्थान झाली. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी पूजन करून पालखीने मंदिरात प्रवेश घेतला. सायंकाळी हजारो दिव्यानी मंदिरात दीपोत्सव साजरा केला. हजारो दिव्याने मंदिर परिसर उजळून निघाला. कसबा बीड गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी राजकीय नेते गावातील तरुण मंडळी व युवा वर्ग महिलावर्ग, आबालवृद्ध यांनी बीडेश्वर महादेवाचा वरहस्त व आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. या महाशिवरात्री कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
करवीर तालुक्यातील कसबा बीड, धोंडेवाडी, आमशी, केकतवाडी या पंचक्रोशीतील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र सातेरी महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासूनच रांग लागली होती. दिंडी सोहळा संपन्न होऊन रिंगण बीडशेड येथे घेण्यात आले. सातेरी महादेवास अभिषेक करून लांबच लांब दर्शन रांगेमध्ये उभे राहून भागातील सर्व पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी दर्शन घेतले. काही ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सरबत, ताक, उपवासासाठी केळी, शाबू खिचडी आदी खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. शंभू महादेव ट्रस्टकडून महाप्रसादाची सोय केली. अशापद्धतीने पाडळी खुर्द, कोगे, महे, कसबा बीड परिसरामध्ये महाशिवरात्र उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.