दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
वार्ताहर / कसबा वाळवे
कसबा वाळवे मंडल अधिकारी विशांत भोसले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेळेवाडी (ता.राधानगरी) येथे दोन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रार दाराने केलेल्या तक्रारी नुसार सापळा रचून ही कारवाही केली.
मंडल अधिकारी कसबा वाळवेचे कामकाज शेळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्याशेजारी असणाऱ्या सांस्कृतीक हॉलमधून गेली अनेक वर्षे चालते. या कार्यालयामध्ये मंडलअधिकारी कसबा वाळवे या पदावर विशांत विलास भोसले (वय ४९ ) हे कार्यरत होते.
त्यांनी तक्रारदार यांचे मित्र यांनी खरेदी केलेल्या प्लॉट चे 7/12 वर नोंद होण्याकरिता डायरीस मंजुरी देण्यासाठी प्रथम 3000/-रुपयेची मागणी करून तडजोडी अंती 2000/-रुपये स्विकारताना आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
या पथकात पर्यवेक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलीस निरीक्षक सतिश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे,पोलीस नाईक सुनिल घोसाळकर, रूपेश माने यांनी सहभाग घेतला होता. कसबा वाळवे मंडल अधिकारी कार्यालयाचं कामकाज हे कसबा वाळवे गावातून चालण आवश्यक होते.
परंतु या कार्यालल्याचे कामकाज हे गेले अनेक वर्षे शेळेवाडी गावातून चालत होते,याचं गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होतो. शेळेवाडी येथील या कार्यालयात पैशाशिवाय कामच होत नाही अशी शेतकरी आणि येथे येणाऱ्या सर्वांची धारणा झाली होती. ऐन कोरोनाच्या महामारीच्या काळात लूट सुरू असल्याने नागरिक त्रस्त होते. अखेर भोसलेवर कारवाही झाल्याने परिसरातील नागरिकांतून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.