दुबई / वृत्तसंस्था
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात एकतर्फी बाजी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा रविंद्र जडेजा आयसीसी अष्टपैलू खेळाडू मानांकनात अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. नाबाद 175 धावांच्या खेळीमुळे जडेजा फलंदाजांमध्ये 54 वरुन 37 व्या स्थानी आला तर गोलंदाजीत 9 बळी घेत तो 17 व्या स्थानी पोहोचला. याशिवाय, या अष्टपैलू योगदानाच्या बळावर त्याने जेसॉन होल्डरला खाली खेचत अव्वलस्थान प्राप्त केले. होल्डर फेब्रुवारी 2021 पासून या मानांकन यादीत अव्वलस्थानी होता. जडेजा यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत प्रथमच अव्वलस्थानी झेपावला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रावळपिंडी कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतके झळकावणारा इमाम-उल-हक 477 गुणांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम 63 व्या स्थानी पोहोचला. त्याचा संघसहकारी अझहर अलीने 185 धावांच्या खेळीसह 12 व्या स्थानी पोहोचला. दुसऱया डावात शतक झळकावणारा अब्दुल्लाह शफीक 67 वरुन 27 व्या स्थानी पोहोचला. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशानेचे शतक हुकले असले तरी 936 गुणांसह तो 12 व्या स्थानी झेपावला. उस्मान ख्वाजा देखील नव्वदीत बाद झाल्यानंतर फलंदाजांमध्ये 24 व्या स्थानी राहिला.
गोलंदाजांमध्ये पाकिस्तानच्या नौमन अलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात 107 धावात 6 बळी घेतले आणि या बळावर तो 51 व्या स्थानी आला. टी-20 क्रिकेट मानांकन यादीत आघाडीच्या 12 फलंदाजांचे मानांकन जैसे थे राहिले.