कोहलीची सातव्या स्थानावर घसरण, टी-20 मध्ये बाबर आझम अव्वलस्थानी
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी मानांकनात भारतीय कर्णधार विराट कोहलीची सातव्या स्थानावर घसरण झाली असून ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशानेने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे टाकत फलंदाजांत प्रथमच पहिले स्थान पटकावले आहे. रोहित शर्माने या क्रमवारीत पाचवे स्थान कायम राखले आहे.
गोलंदाजांमध्ये भारताचा आर. अश्विन दुसऱया स्थानावर स्थिर असून ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कसोटी खेळलेला कोहली याआधी सहाव्या स्थानावर होता आणि आता 756 मानांकन गुणांसह तो सातव्या स्थानावर घसरला आहे. लाबुशानेने या क्रमवारीत पहिल्यांदाच अग्रस्थानी झेप घेतली आहे. ऍशेस मालिकेतील दोन सामन्यात त्याने जबरदस्त प्रदर्शन केल्याचा त्याला यासाठी लाभ झाला. मालिका सुरू होण्याआधी तो चौथ्या स्थानावर होता आणि पहिल्या कसोटीनंतर तो दुसऱया स्थानावर पोहोचला होता. त्याचे 912 रेटिंग गुण असून रूट 897 गुणांसह दुसऱया स्थानी आहे. कसोटी गोलंदाजांत मिशेल स्टार्क टॉप टेनमध्ये आला आहे. दुसऱया कसोटीत त्याने 10 बळी मिळविले होते. तो आता नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
टी-20 मध्ये बाबर आझम अग्रस्थानी
टी-20 मानांकनात पाकचा कर्णधार बाबर आझमने पुन्हा अग्रस्थान मिळविले आहे. मागील आठवडय़ात तो तिसऱया स्थानावर घसरला होता. इंग्लंडच्या डेव्हिड मलानसमवेत तो सध्या संयुक्त अग्रस्थानी आहे. बाबरचा सलामीचा सहकारी मोहम्मद रिझवानने तिसऱया स्थानावर झेप घेताना 798 रेटिंग गुण मिळविले आहेत. त्याचे आजवरचे हे सर्वोच्च मानांकन आहे. भारताच्या केएल राहुल या क्रमवारीत पाचव्या स्थानावर असून गोलंदाजांत टॉप टेनमध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.