आयसीसी नवी मानांकन यादी जाहीर :न्यूझीलंडचा जलद गोलंदाज काईल जेमिसनची तिसऱया स्थानी झेप
दुबई / वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा जलद गोलंदाज काईल जेमिसन आयसीसी कसोटी मानांकन यादीत कारकिर्दीतील सर्वोत्तम तिसऱया स्थानी झेपावला असून भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱया स्थानी कायम आहे. न्यूझीलंड-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका पूर्ण झाल्यानंतर ही ताजी क्रमवारी जाहीर केली गेली.
27 वर्षीय काईल जेमिसनने ख्राईस्टचर्चमधील दुसऱया कसोटी सामन्यातील 6 बळींसह एकत्रित 8 बळींची नोंद केली. शिवाय, तो 825 रेटिंग गुणांवर झेप घेणारा न्यूझीलंडचा केवळ पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी, रिचर्ड हॅडली (नोव्हेंबर 1985 मध्ये 909 गुण), नील वॅग्नर (डिसेंबर 2019 मध्ये 859 गुण), टीम साऊदी (नोव्हेंबर 2021 मध्ये 839 गुण) व ट्रेंट बोल्ट (मे 2015 मध्ये 825 गुण) या किवीज गोलंदाजांनी असा पराक्रम गाजवला असून या मांदियाळीत जेमिसन दाखल झाला.
जलद गोलंदाज बोल्ट देखील मालिकेत 9 बळींसह ताज्या मानांकन यादीत 12 व्या स्थानावरुन 9 व्या स्थानी झेपावला. किवीज फलंदाजांमध्ये टॉम लॅथम 11 वरुन 9 व्या स्थानी पोहोचला. त्याने मालिकेत 267 धावा जमवल्या. 2 शतकांसह 244 धावांचे योगदान देणाऱया डेव्हॉन कॉनवेने 29 वरुन 18 व्या स्थानावर झेप घेतली आहे. रॉस टेलर 28 व्या स्थानासह कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला.
बांगलादेशचा लिटॉन दास कारकिर्दीतील सर्वोत्तम 15 व्या स्थानी झेपावला. त्याने 196 धावांचे योगदान दिले होते. मोमिनूल हक (37 वा) व नजमूल होसेन (87) यांचे मानांकनही सुधारले. जलद गोलंदाज इबादत हुसेन मालिकेत 9 बळींसह 88 व्या स्थानी पोहोचला. डब्ल्यूटीसी गुणतालिकेत सध्या न्यूझीलंडचा संघ सहाव्या तर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात सिडनीत खेळवल्या गेलेल्या चौथ्या अनिर्णीत कसोटीनंतर उस्मान ख्वाजाचे स्थान सुधारले असून तो 26 व्या स्थानी पोहोचला. 35 वर्षीय ख्वाजाने दोन्ही डावात शतके झळकावताना अनुक्रमे 137 व नाबाद 101 धावांचे योगदान दिले होते. जोहान्सबर्ग कसोटीत नाबाद 96 धावांची खेळी साकारणारा दक्षिण आफ्रिकन कर्णधार डीन एल्गार जानेवारी 2019 नंतर प्रथमच पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे. भारतीय संघातर्फे सामन्यात 8 बळी घेणाऱया शार्दुल ठाकुरने गोलंदाजांच्या यादीत 42 व्या स्थानी झेप घेतली. यापूर्वी जाहीर मानांकन यादीत तो 52 व्या स्थानी होता