वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सनच्या कोपराला दुखापत झाली असून मायदेशात होणाऱया आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो खेळू शकणार नाही, अशी माहिती क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने दिली.
विल्यम्सनने या दुखापतीवर डॉक्टरांचा सल्ला घेतला असून शस्त्रक्रियेमुळे सदर दुखापत पूर्णपणे बरी होणार नाही असे मत डॉक्टरांनी नोंदवले. गेल्या काही दिवसापासून विल्यम्सनला या दुखापतीने चांगलेच त्रासले असल्याने तो बांगलादेश विरूद्ध कसोटी मालिकेत खेळू शकला नाही. विल्यम्सनने आपली शेवटची कसोटी गेल्या नोव्हेंबरमध्ये भारताविरूद्ध खेळली होती. न्यूझीलंड संघातील अनुभवी रॉस टेलरने निवृत्तीचा निर्णय घेतल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजीवर थोडे दडपण आले आहे. आता अष्टपैलू मिचेलला कदाचीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या आगामी मालिकेसाठी न्यूझीलंड संघामध्ये हमीश रूदरफोर्ड आणि अष्टपैलू ग्रॅण्डहोम यांचे पुनरागमन झाले असून यष्टीरक्षक फ्लेचर आणि वेगवान गोलंदाज टिकनेर हे दोन नवे चेहरे आहेत.
या मालिकेतींल पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज बोल्ट खेळणार नाही. उभय संघातील हे दोन्ही कसोटी सामने ख्राईस्टचर्चमध्ये खेळविले जाणार आहेत. पहिल्या कसोटीला 17 फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये आतापर्यंत न्यूझीलंड संघाला दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविता आलेला नाही.