प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर खडेबाजार रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्टसिटी योजने अंतर्गत करण्यात आले आहे. मात्र सदर रस्त्याचे काम करताना कोणतेच नियोजन करण्यात आले नसल्याने कामे ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. काँक्रिटीकरणानंतर डेनेज चेंबर बांधण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने रस्त्यावर अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्मार्टसिटीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले, पण प्रारंभीपासूनच कामात सातत्य नसल्याने व्यावसायिक आणि रहिवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले. पण नियोजनाअभावी अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. याठिकाणी पावसाचे पाणी वाहण्यासाठी पाईप घालण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. पण गटारीमधील जलवाहिन्या व विद्युतवाहिन्या हटविण्यात आले नसल्याने कचरा अडकून पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे व्यावसायिकांना पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागत आहे. तसेच येथील काँक्रिटीकरणापूर्वी डेनेज चेंबरची उंची वाढविण्याची गरज होती. तसेच खराब झालेल्या चेंबरचे बांधकाम करण्याची आवश्यकता होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परिणामी ड्रेनेज तुंबल्यामुळे आता डेनेज चेंबर शोधण्याची वेळ आली आहे. डेनेज चेंबरची उंची वाढविण्याबरोबर दुरूस्तीकरिता शहापूर खडेबाजारमधील डेनेज चेंबर खुले करण्यात आले आहे. याकरिता काँक्रिट करण्यात आलेला रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.