नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना काँगेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रभावशाली मागासवर्गिय नेते आर. पी. एन. सिंग यांनी काँगेसत्याग करुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सिंग हे मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्रीही होते. भारत हीच आपली प्राथमिकता आहे आणि होती, असे त्यांनी सोनिया गांधींना ट्विट केलेल्या राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे. सध्या ते काँगेसचे झारखंड राज्याचे प्रभारी होते.
त्यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील पाद्रौना मतदारसंघातून काँगेसचे उमेदवार म्हणून पराभव झाला होता. आता त्यांना या निवडणुकीत त्याच मतदारसंघातून भाजपमधून सपमध्ये गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सिंग हे कुशीनगरच्या सैंथवार राजघराण्याचे वंशज आहेत. ते काँग्रेसच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जात असत. त्यांचे पिताही काँगेसचे नेते होते. त्यांच्या पक्षत्यागावर काँगेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपशी लढायचे असेल तर धाडसाची आवश्यकता आहे. हे भेकडांचे काम नाही, असे वक्तव्य काँगेसच्या पक्ष प्रवक्त्यांनी केले. तृणमूल काँगेसनेही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.