प्रतिनिधी/ बेळगाव :
काँग्रेस रोडच्या काँक्रिटीकरणासाठी तब्बल सह महिने हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. पण इतका अवधी हा रस्ता बंद ठेवून देखील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणारी विकास कामे अर्धवट आहेत. आता जलवाहिनी व विविध वाहिन्या घालण्यासाठी रस्त्या शेजारी खोदाई करण्यात आल्याने रहिवाशांसह वाहनधारकांच्या अडचणीत भर पडली आहे. ही कामे कधी पूर्ण होणार अशी विचारणा नागरीक करीत आहेत.
काँग्रेस रोडचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या दोन्ही बाजुनी काँक्रिटीकरण करण्यासाठी गोगटे चौक ते तिसरा रेल्वे गेटपर्यंतचा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. तब्ब सहा महिने हा रस्ता बंद ठेवूनही येथील विकास कामे अर्धवट आहेत. रस्त्याच्या काँक्रिटीकरणानंतर गटारी बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजुने अडथळा निर्माण झाला आहे. हे काम पूर्ण होताच आता जलवाहिन्या आणि विविध मोबाईल केबल व अन्य वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. सदर काम सुरू करून महिना होत आला पण अद्यापही अपूर्ण आहे. रस्त्या शेजारी मातीचे ढिगारे आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी जलवाहिन्या व डेनेज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. पण काही ठिकाणी अद्याप हे काम अपुर्ण आहे. जलवाहिनी घालण्यासाठी घर, कार्यालय आणि विविध दुकानांसमोर खोदाई करण्यात आली असल्याने नागरीकांना ये-जा करताना गैरसोयीचे बनले आहे. काही ठिकाणी ये-जा करण्यापुरते साकव घालण्यात आले आहेत. पण व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. गॅरेज तसेच अन्य व्यवसायिकांना वाहने गॅरेजमध्ये नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर वाहने थांबविल्यास वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. घराच्या चौकटीसमोरच चार खोदण्यात आली असल्याने दरवाजा उघडताच खड्डय़ाचा अडथळा येतो. काही वेळा लक्षात नसताना घरातून बाहेर निघाल्यास थेट खड्डय़ात पडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही वयस्कर नागरीक आणि लहान मुले या खड्य़ांमध्ये पडले असल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे सदर काम तातडीने पूर्ण करावे आणि रस्ता व्यवस्थित करावा, अशी मागणी होत आहे.