हायकमांडकडून शिक्कामोर्तब : निजदची भूमिका अद्याप अस्पष्ट
प्रतिनिधी / बेंगळूर
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी राज्य काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत सतीश जारकीहोळी यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सहा दिवसांनंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र, हायकमांडने याबाबत शुक्रवारी अधिकृतपणे घोषणा केली आहे. एआयसीसीचे मुख्य सचिव मुकुल वासनिक यांनी एका पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.
गुरुवारी रात्री भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेस हायकमांडकडून उमेदवार घोषित करण्यात आला आहे. निजदने पेवळ बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातून उमेदवार दिला आहे दरम्यान, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीबाबत निजदची भूमिका अद्याप समजलेली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 30 मार्च शेवटची तारीख आहे. तर 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण आणि रायचूर जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने मागील आठवडय़ात उमेदवारांची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे पोटनिवडणूक घोषणा न झालेल्या विजापूर जिल्हय़ातील सिंदगी मतदारसंघासाठी देखील उमेदवार जाहीर केला होता.