दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर शिक्षकांसाठी सिद्धूंचा हल्लाबोल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी दिल्ली सरकार विरोधात अतिथी शिक्षकांकडून सुरू असलेल्या आंदोलनात रविवारी भाग घेतला आहे. हे शिक्षक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर स्थायी नोकरीच्या मागणीवरून निदर्शने करत आहेत.
दिल्लीचे शिक्षण मॉडेल हे कंत्राटी मॉडेल आहे. दिल्ली सरकारच्या 1031 शाळा आहेत, तर केवळ 196 शाळांमध्ये मुख्याध्यापक आहे, शिक्षकांची 45 टक्के पदे रिक्त असून 22,000 अतिथी शिक्षकांकडून दैनिक वेतनावर शाळा चालविल्या जात आहेत. दर 15 दिवसांनी कंत्राटाचे नुतनीकरण केले जात असल्याचा दावा सिद्धू यांनी ट्विट करत केला आहे.
सिद्धू यांच्या या कृतीकडे काँग्रेसचे आम आदमीला प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी पंजाबमधील अशाच आंदोलनात भाग घेतला होता.
‘आप’ने कंत्राट शिक्षकांना स्थायी कर्मचाऱयांइतके वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. पण अतिथी शिक्षक असल्याने त्यांची स्थिती अधिकच खराब झाली आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून कथित आप स्वयंसेवक शासकीय निधीतून दरवर्षी 5 लाख रुपये कमावत असल्याचा आरोप सिद्धू यांनी केला आहे. 2015 च्या घोषणापत्रात ‘आप’ने दिल्लीत 8 लाख नव्या नोकऱया आणि 20 नव्या महाविद्यालयांचे आश्वासन दिले होते. नोकऱया आणि महाविद्यालये कुठे आहेत? दिल्लीत केजरीवाल सरकारने केवळ 440 नोकऱया दिल्या आहेत. ‘आप’च्या हमीच्या उलट दिल्लीत बेरोजगारी दर मागील 5 वर्षांमध्ये सुमारे 5 पटीने वाढला आहे. 2015 मध्ये दिल्लीत शिक्षकांची 12,515 पदे रिक्त होती. 2021 मध्ये शिक्षकांची 19,907 पदे रिक्त आहेत. सरकार अतिथी शिक्षकांच्या माध्यमातून रिक्त पदे भरत असल्याची टीका सिद्धू यांनी केजरीवालांवर केली आहे.