उदय मडकईकर यांचे काँग्रेस श्रेष्ठींना पत्र
प्रतिनिधी/ पणजी
फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी इंदोरमध्ये राहूल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पणजीचे नगरसेवक उदय मडकईकर यांनी काँग्रेस श्रेष्ठींना पत्र लिहून गोव्यातील काँग्रेसची धुरा सरदेसाई यांच्याकडेच सोपवावी असे आवाहन केले आहे.
पक्ष नेतृत्वाला लिहिलेल्या पत्रात मडकईकर यांनी काँग्रेस श्रेष्ठींनी आमदार विजय सरदेसाई यांना गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यास सांगावे व पक्षाची धुरा त्यांच्याकडेच सोपवावी असे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षाने गोव्यासाठी जी नवी समिती स्थापन केली आहे त्यात पक्षाला न्याय देऊ शकेल, तो वाढवू शकेल, मजबूत करू शकेल असे वाटत नाही. तसेच शत्रुपक्षाशी प्रभावी लढा देऊ शकेल असे कोणतेही नेतृत्वही दिसत नाही, असे मडकईकर यांनी पत्रात म्हटले आहे.
आपल्या पत्रात पुढे त्यांनी, काँग्रेसमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचेच राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे. अशाने पक्ष उभारी घेऊ शकणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःमधील अहंकार बाजूला सारावा लागेल. परंतु नव्या समितीत पदाधिकाऱयांची झालेली निवड पाहिल्यास त्यातील कोणीही पक्षाला न्याय देऊ शकेल, व्यवस्थित पुनर्बांधणी करून दूर गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणू शकेल असे व्यक्तीमत्व दिसत नाही, असे मडकईकर यांनी म्हटले आहे. अशावेळी राज्यभरात असंख्य चाहते, कार्यकर्ते असलेल्या श्री. सरदेसाई यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविल्यास काँग्रेस मजबूत करण्यात ते सिंहाचा वाटा उचलू शकतील. त्याचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वास मडकईकर यांनी व्यक्त केला आहे