प्रतिनिधी /पणजी
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करून आढावा घेण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाची सूत्रे नवीन गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर व विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना प्रदान करण्यासाठी आज सोमवार 11 एप्रिल रोजी काँग्रेस पक्षातर्फे पणजीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रीन एकर्स, सांत ईनेज रोड-टोंक-मिरामार पणजी येथे सायंकाळी 4.30 वा. हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, प्रभारी दिनेश गुंडुराव हे खास उपस्थित रहाणार आहेत. आमदार दिगंबर कामत हे विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे लोबो यांना देणार असून गिरीश चोडणकर हे अध्यक्षपदाची सूत्रे पाटकर यांना प्रदान करणार असल्याचे सांगण्यात आले.
हा कार्यक्रम म्हणजे एक बैठक असून पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, आजी-माजी आमदार, मंत्री, खासदार फ्रान्सिस सार्दिन अशा सर्वांना यासाठी पाचारण करण्यात आले असून पराभवाची चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली.