ऑनलाईन टीम / चंदीगड :
काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहीत दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, रविवारी रात्री मला थोडा ताप जाणवत होता. त्यामुळे सोमवारी सकाळी मी माझी कोरोना चाचणी करून घेतली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. खरे तर एकाच वेळी दोन चाचण्या घेतल्या. इतर कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. तसेच मागील काही दिवसांपासून जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. ते गुरुग्राम मधील रुग्णालयात दाखल असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, सद्य स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे.