भारती हॉस्पिटलचे मानद संचालक एच. एम. कदमही बाधित
प्रतिनिधी/ सांगली
काँग्रेसचे नेते जितेश कदम यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच सांगलीच्या भारती हॉस्पिटलचे मानद संचालक एच. एम. कदम आणि त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या तिघांच्यावर पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या तिघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी फेसबुकच्या पोस्टव्दारे दिली आहे.
जितेश कदम हे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे पुतणे तर माजी मंत्री कै. मदन पाटील यांचे जावई आहेत. ते सांगली, मिरज आणि पलूस-कडेगाव मतदारसंघात सातत्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. विविध गावात बैठका घेत असतात. त्यामुळे ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनाही तातडीने क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे. जितेश कदम यांची तब्येत खणखणीत आहे. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. त्यांच्याबरोबरच डॉ. विश्वजित कदम यांचे चुलत बंधू आणि भारती हॉस्पिटलचे मानद संचालक एच. एम.क् ाढदम आणि त्यांच्या पत्नीही पॉझिटिव्ह आल्याने कदम कुटुंबीयातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या तिघांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू करण्यात आले आहेत. या तिघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी स्वतःहून अलगीकरण करून घ्यावे असे सांगण्यात आले आहे. जितेश कदम यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समजताच सांगली शहरातील त्यांच्या संपर्कातील असणाऱया कार्यकर्त्यांनी तातडीने स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. कोरोनाच्या काळात जितेश कदम यांनी विविध गावात सॅनिटायझरचे वाटप, अर्सेनिक अल्बमच्या गोळय़ाचे वाटप असे उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये थोडी अस्वस्थता पसरली होती. पण राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती देत त्यांच्या प्रकृतीवर आपण स्वतःहून लक्ष देत असल्याची माहिती त्यांनी दिल्याने कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी मात्र स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे.