प्रतिनिधी/ खेड
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व नाबार्ड ऑल इंडिया युनियनचे सरचिटणीस तसेच तालुक्यातील कुंभाडचे सुपुत्र ऍड. विजय कृष्णाजी भोसले (58) यांचे पुणे येथील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान सोमवारी सकाळी 9 वाजता निधन झाले.
वकिली क्षेत्रात कार्यरत असताना ऍड. भोसले यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. जन्मभूमी प्रतिष्ठानची निर्मिती करत तालुक्यातील बचतगटांना उभारी देण्यात त्यांचे मौलिक योगदान होते. गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी ते अग्रस्थानी होते. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. जिल्हय़ात कार्यकर्त्यांना एकसंध करत जिल्हा काँग्रेसला नवी उभारी दिली. यासाठी अनेकदा आंदोलनेदेखील केली. नाबार्डच्या माध्यमातून कामगारांच्या न्यायहक्कासाठीही त्यांचा लढा अविरतपणे सुरू होता. सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱयांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने जिल्हा काँग्रेसच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना काँग्रेसच्या पदाधिकाऱयामधून व्यक्त केल्या.