पोलीस आयुक्तांना जैन बांधवांचे निवेदन : अन्यथा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /बेळगाव
म्हैसूर येथील काँग्रेसचे नेते आयुब खान यांनी गोमटेश्वर यांचा अवमान केला आहे. याचबरोबर संपूर्ण जैन समाजाचादेखील अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि योग्य ती कारवाई करा, अशी मागणी जैन समाजाच्यावतीने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकावर मोर्चा काढून करण्यात आली. तसेच यासंबंधीचे निवेदन पोलीस आयुक्तांनाही देण्यात आले आहे.
सध्या हिजाबवरून जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. यामध्ये जैन समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या त्या नेत्याने केला आहे. डोंगरावर असलेल्या गोमटेश्वरांच्या मूर्तीला प्रथम कपडे घाला, असे सांगून साऱयांचाच त्यांनी अवमान केला आहे. यामुळे जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. तेव्हा त्या नेत्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
अश्लील शब्दामध्ये त्यांनी अवमान केला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांना व बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ऍड. हर्षवर्धन पाटील, कुंतीनाथ कलमनी, ऍड. संजय कुंचनुरे, अभय अवलक्की, कुंतूसागर हरदी, पुष्पक हणमण्णावर, विक्रम जैन, अमित दोशी, जितोचे सदस्य व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.