लोकसभेतील विरोधी पक्षनेते चौधरी यांचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील कटूता आता वाढत चालली आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले आहे. ममता बॅनर्जी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत सूरा खूपसत असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.
चालू वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यावर ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय राजकारणात भाजपविरोधी गटाचे नेतृत्व करू पाहत आहेत. तृणमूल काँग्रेस सातत्याने विस्तार करत असल्याने सर्वात मोठा काँग्रेसला बसत आहे. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे नेते तृणमूलमध्ये सामील होत आहेत.
ममता बॅनर्जी देशाच्या विविध भागांमधील काँग्रेस नेत्यांना स्वतःच्या पक्षात सामील करत आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीलाच त्या एकप्रकारे सुरुंग लावत आहेत. राजीव गांधी यांनी ममतांना काँग्रेसमध्ये मोठे स्थान दिले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआत त्यांना मंत्रिपद मिळाले. आता स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी त्या काँग्रेसच्या पाठीत सूरा खूपसत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध असल्याने आमच्या पक्ष सहजपणे लक्ष्य ठरतोय असा दावा चौधरी यांनी केला आहे.
ममता-मोदी यांच्यात गुप्त करार! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात एखादा गुप्त करार झाला असावा. दीदी आणि मोदी यांच्यात संगनमत झाले आहे यात संशय नाही. स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना सीबीआय आणि ईडीपासून वाचविण्यासाठी ममतांनी मोदींसमोर शरणागती पत्करल्याचा आरोप चौधरी यांनी केला