अनेक मुली जखमी : काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान
वृत्तसंस्था/ बरेली
उत्तरप्रदेशच्या बरेलीमध्ये मंगळवारी सकाळी काँग्रेसकडून आयोजित मॅराथॉनमध्ये चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. मॅराथॉनमध्ये अधिक गर्दी झाल्याने आयोजकांना स्थिती सांभाळता आली नाही. मॅराथॉन सुरू होताच सर्वात पुढे धावणाऱया मुली धक्का लागल्याने खाली कोसळल्या. त्यानंतर मागून येणारी गर्दी त्यांना तुडवत पुढे जाऊ लागली. चित्कारादरम्यान चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी झाल्या आहेत. या घटनेचे वृत्तांकन करणाऱया प्रसारमाध्यम प्रतिनिधींना काँग्रेसच्या नेत्यांच्या दमदाटीला तोंड द्यावे लागले आहे.
बरेलीच्या माजी महापौर आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया ऐरन यांनी यात एका विधानाद्वारे वाद ओढवून घेतला आहे. वैष्णोदेवीमध्ये चेंगराचेंगरी होऊ शकते. मग येथे तर मुलींची गर्दी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
प्रियंका वड्रा यांच्या ‘लडकी हूं-लड सकती हूं’ मोहिमेच्या अंतर्गत ही मॅराथॉन आयोजित करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येत मुली यात सहभागी झाल्या होत्या. चेंगराचेंगरीत अनेक मुली जखमी झाल्यावर आयोजक गायब झाले. बहुतांश मुलींच्या कुटुंबीयांनीच त्यांना तेथून घरी नेले आहे.