प्रतिनिधी /मडगाव
मडगावकारांनी राज्याच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी नेहमीच योगदान दिले आहे. या वेळी 2022 मध्ये काँग्रेसचे स्थिर सरकार स्थापन करण्यात मडगावकर आपली निर्णायक भूमिका बजावतील. मी माझ्या मडगावकर वासियांना आवाहन करतो की, मला सलग आठव्यांदा मडगावचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, असे उद्गार विरोधी पक्षनेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काढले.
काल सोमवारी पिंपळकट्टा येथे मडगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी देव दामोदर चरणी नारळ अर्पण केल्यानंतर आपल्या शेकडो समर्थकांना संबोधित करताना ते बोलत होते. स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर, मडगावच्या उपनगराध्यक्ष दिपाली सावळ, दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस, नगरसेवक दामोदर शिरोडकर, लता पेडणेकर, सँड्रा फर्नांडिस, सगुण नाईक, सिद्धांत गडेकर आणि दामोदर वरक, माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर, मनोज मसुरकर, गुरुनाथ लाड, ज्ये÷ पत्रकार अनिल पै, डॉ. जयेश कुडचडकर आदींसह समर्थक व हितचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कामत सामान्यांसाठी नेहमीच उपलब्ध असतात
आगामी विधानसभा निवडणूक दिगंबर कामत जिंकून इतिहास घडवतील यात शंका नाही. ते तळागळातून राजकारणात आले आहेत आणि सामान्यांसाठी नेहमीच सहज उपलब्ध राहिले आहेत. गेली सात टर्म ते माझ्या मडगाव शहराचे आमदार आहेत याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन मडगाव नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष अजित हेगडे यांनी केले.
आपण मडगांवकरांना आवाहन करतो की, येत्या विधानसभा निवडणुकीत दिगंबर कामत यांना प्रचंड विजय मिळवून द्या आणि गोव्याचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी द्या असे प्रतिपादन ज्ये÷ पत्रकार अनिल पै यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले.
नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले तर अविनाश शिरोडकर यांनी आभार मानले. आशा कामत, मडगाव न्यू मार्केट टेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शिरोडकर, कुंकळ्ळी गट काँग्रेसचे अध्यक्ष असिस नोरोन्हा, सावियो मास्कारेन्हस, अमिना शेख, अमित पिंटो, नसिमा शेख शिरोडकर, बुश मिरांडा आणि इतर प्रमुख नागरिकही या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित होते.