केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे सूचक वक्तव्य
पंजाब निवडणुकीकरता चरणजीत सिंह चन्नी यांना काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले आहे. यामुळे नवज्योत सिंह सिद्धू यांच्या भूमिकेसाठी सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर पक्षाचे दिग्गज नेते सुनील जाखड यांनी अचानक सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. अशा स्थितीत पंजाब भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेस स्वतःच्याच अंतर्गत कलहाला तोंड देत आहे. नवज्योत सिंह सिद्धू काय म्हणत आहेत यावर कुठलीच टिप्पणी करणार नाही. परंतु काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप घडून येणार असल्याचे शेखावत म्हणाले.
सिरसा डेरा प्रमुख गुरमीत राम रहिमला पंजाब निवडणुकीपूर्वी फरलो मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर बोलताना शेखावन यांनी प्रत्येक घटनेकडे राजकीय दृष्टींकोनातून पाहण्याची अनेकांना सवय झाल्याची टिप्पणी केली. या निर्णयात हरियाणा सरकारचा कुठलाच संबंध नसल्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्पष्ट केले असल्याचे ते म्हणाले.